पिंजरच्या विविध समस्या घेऊन १२ एप्रिल रोजी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. पिंजर येथे पाच महिन्यापासून कनिष्ठ अभियंता नसल्यामुळे कनिष्ठ अभियंत्यांची देण्याची प्रामुख्याने मागणी करण्यात आली होती. अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांना तक्रार दिल्यानंतर त्यांनी आश्वासन दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी सरपंचांनी फोन करून कछोट यांच्याकडे कनिष्ठ अभियंत्यांची मागणी केली. परंतु त्यांनी दुसऱ्या अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर संबधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधल्यावर त्यांनी आणखी एका अधिकाऱ्याचे नाव सांगितले. अधिकारीच टोलवाटोलवी करीत असल्याने, न्याय मागावा तरी कुणाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वरिष्ठ अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवित असून कर्तव्यात कसूर करीत असल्याचा आरोप सरपंच व नागरिकांनी केला आहे. पिंजर हे तालुक्यातील मोठे गाव असून आजूबाजूला ६४ खेडेगाव आहेत. पिंजर येथे कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंत्याची गरज आहे. वादग्रस्त ठरलेले मंगेश प्रभाकर राणे यांच्याकडे प्रभार दिला आहे. परंतु राणे हे पिंजरला राहत नाहीत, असा लोकांचा आरोप आहे. पिंजरला कनिष्ठ अभियंता देऊन येथील वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पिंजर येथे विजेची समस्या आहे. सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो. पिंजर येथे कनिष्ठ अभियंता देण्यासाठी निवेदन दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. परंतु अधिकारी दुर्लक्ष करीत असून, एकमेकांकडे बोट दाखवित आहेत.
-चंद्रभागा पुंडलिकराव मानकर, सरपंच, पिंजर