अकोला: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांची कल चाचणी सोमवार, ८ फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहे. कल चाचणी ही १५२ प्रश्नांवर आधारित मानसशास्त्रीय चाचणी आहे. इयत्ता दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांंच्या आयुष्याला कलाटणी देणारी असून, येथूनच विद्यार्थी शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांच्या निवडीला प्रारंभ करतात; परंतु या विद्यार्थ्यांंना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांच्याकडून चुकीच्या व्यावसायिक क्षेत्राची निवड होण्याची शक्यता असते. परिणामी विद्यार्थ्यांंमध्ये ताण-तणाव, नैराश्याचे प्रमाण वाढीला लागते. या प्रकाराला आळा घालून, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांंना उच्च शिक्षण किंवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड करण्यास मार्गदर्शक ठरेल, या अनुषंगाने कल चाचणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. सोमवारपासून राज्यभरात कल चाचणीला प्रारंभ करण्यात येत आहे. ही कल चाचणी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याने सर्व्हरची गती मंद होण्याची शक्यता आहे. या प्रकारावर नियंत्रण यावे, या उद्देशाने ही चाचणी ८ ते २५ फेब्रुवारी या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. ही चाचणी मानसशास्त्रीय प्रश्नांवर आधारित असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांंची रुची, त्यांची आवड जाणून घेण्यास मदत होईल. चाचणीमध्ये १५२ प्रश्न विचारण्यात येणार असून, यासाठी विद्यार्थ्यांना ४0 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.
कल चाचणीला आजपासून प्रारंभ
By admin | Published: February 08, 2016 2:29 AM