अकोला, दि. ५: शौचालय नसल्याचे सांगत महापालिकेकडे नावाची नोंदणी केली. खात्यामध्ये सहा हजार रुपयांच्या अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त करून घेतला. नंतर मात्र शौचालय न बांधता आरोग्य निरीक्षकांनाच दमदाटी केली. अशा सहा लाभार्थ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचा आदेश महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी क्षेत्रीय अधिकार्यांना दिला आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शौचालय नसणार्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना शौचालय बांधून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने महापालिकेला १४ कोटींचा निधी दिला. या निधीतून मनपाच्या स्तरावर वैयक्तिक शौचालय उभारून दिले जात आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने निधी जमा केला जात आहे. मनपा प्रशासनाने दहा हजार ७७८ लाभार्थ्यांची निवड केली असून आजपर्यंत ५ हजार ८१६ लाभार्थ्यांंच्या शौचालयांची बांधकामे पूर्ण झाली. यादरम्यान, काही लाभार्थी मनपा प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला. घरी शौचालय नसल्याचे सांगत मार्च महिन्यात आरोग्य निरीक्षकांकडे नावाची नोंदणी केली. मनपाने शौचालय बांधण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात सहा हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. त्यानंतर वारंवार शौचालय बांधण्याची सूचना केली असता, सुरुवातीला संबंधित लाभार्थ्यांंनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र आरोग्य निरीक्षकांचा पाठपुरावा वाढताच लाभार्थ्यांंनी अरेरावी सुरू केली. मनपाने पाठवलेल्या नोटीसला केराची टोपली दाखवल्यानंतर आमच्या विरोधात गुन्हे दाखल केले तरी फरक पडणार नसल्याचे सांगत आरोग्य निरीक्षकांनाच दमदाटी सुरू केली. या प्रकाराची माहिती संबंधित क्षेत्रीय अधिकार्यांनी आयुक्त अजय लहाने यांना दिल्यानंतर आयुक्तांनी अशा बोगस लाभार्थ्यांविरुद्ध फौजदार गुन्हे दाखल करण्याचे फर्मान जारी केले आहेत.
पैसा घेतला; शौचालय बांधलेच नाही!
By admin | Published: August 06, 2016 2:00 AM