- संतोष येलकर
अकोला: दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाच, तुरीच्या पिकाचेही खरे नाही. जमिनीत ओलावा नसल्याने तुरीचे उत्पादन ५० टक्क्यापेक्षा अधिक घटण्याची शक्यता असल्याने, शेतकरी चिंतेत सापडला आहे.पावसातील खंड, जमिनीतील कमी आर्द्रता, भूजल पातळीत घट आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यात शासनामार्फत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्रात जमिनीत ओलावा नसल्याने, कपाशीच्या झाडांना आता पात्या-फुले आणि बोंड्या राहिल्या नसून, कपाशीचे पीक सुकले आहे. त्यामुळे यावर्षी डिसेंबर महिन्यातच कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असून, उत्पादनात घट झाल्याने, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कापूस पिकाचे उत्पादन हातून गेल्याने, कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांची तूर पिकावर भिस्त होती; मात्र परतीच्या पावसाने हजेरी लावली नाही. दुष्काळी परिस्थितीत जमिनीत ओलावा नसल्याने, अडचणीत सापडलेल्या तुरीच्या पिकाचीही स्थिती चांगली नाही. ५० टक्क्यापेक्षा अधिक तूर पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने, कपाशी पाठोपाठ तूर उत्पादक शेतकरीही चिंतेत सापडला आहे.सोयाबीनच्या शेतात पेरता आला नाही हरभरा!अकोला तालुक्यासह इतर भागात सोयाबीनचे पीक काढल्यानंतर हरभरा पेरणीची तयारी शेतकºयांनी केली होती; मात्र जमिनीत पेरणीयोग्य ओलावा नाही आणि काटेपूर्णा प्रकल्पातून रब्बी सिंचनासाठी सोडण्यात आलेले पाणी विलंबाने सोडण्यात आल्याने, कोरडवाहू क्षेत्रात सोयाबीनच्या शेतांत शेतकºयांना हरभरा पेरता आला नाही. पेरणी हुकल्याने, रब्बी हरभºयाचे उत्पादनही शेतकºयांच्या हातून गेले.बागायती गहू पेरणी सुरू; पण क्षेत्र अत्यल्प!जिल्ह्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध असलेल्या भागात बागायती गव्हाची पेरणी सुरू करण्यात आली आहे; परंतु जिल्ह्यात बागायती गहू पेरणीचे क्षेत्र अत्यल्प आहे.
कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे; तूर पिकाच्या उत्पादनावर भिस्त होती; मात्र जमिनीत ओलावा नसल्याने, यंदा तूर पिकाचे उत्पादनही ५० टक्क्यापेक्षा अधिक घटणार आहे. जमिनीत ओलावा नाही आणि सिंचनासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून विलंबाने पाणी सोडण्यात आल्याने, सोयाबीनच्या शेतात हरभरा पेरणी करता आली नाही.- शिवाजी भरणे, शेतकरी, रामगाव, ता. अकोला.