अकोला: महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींपासून परिसरातील रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण होतो. याविषयी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही कारवाई होत नसल्याचा अनुभव आहे. यंदा मात्र आयुक्त अजय लहाने यांनी शिकस्त इमारती जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले. पूर्व झोनमधील बिर्ला रोडवरील शिकस्त इमारत प्रशासनाने शुक्रवारी धाराशायी केली. पावसाळ्य़ात दरवर्षी महापालिका क्षेत्रातील जीर्ण व शिकस्त इमारती खाली करण्याची सूचना प्रशासनाकडून नोटीसद्वारे दिली जाते; मात्र मालमत्ताधारक जिवाची पर्वा न करता त्याच इमारतीत तळ ठोकून राहतात. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवालासुद्धा धोका निर्माण होतो. मनपा दप्तरी असलेली इमारतींची संख्या पाहता, जीर्ण इमारतींचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून जीर्ण इमारती जमीनदोस्त करण्याचे निर्देश आयुक्त अजय लहाने यांनी क्षेत्रीय अधिकार्यांना दिले. आयुक्तांच्या निर्देशानुसार बिर्ला रोडवरील मालमत्ताधारक गोदावरीबाई पाठक यांची शिकस्त इमारत धाराशायी करण्याची कार्यवाही करण्यात आली. पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभाग व नगर रचना विभागाने ही कारवाई पार पाडली.
शिकस्त इमारत धाराशायी!
By admin | Published: July 02, 2016 2:14 AM