बहिरखेड (जि. अकोला) : गावालगतच्या तलावात बुडून दोघांचा करून अंत झाल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव (मारखेड)येथे रविवार, २४ जून रोजी घडली. चेतन विलास राठोड (११) आणि रंजीत रमेश राठोड (२१) अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांंची नावे आहेत.बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव (मारखेड) येथे पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेअंतर्गत गत वर्षी तलाव खोदण्यात आला आहे. यावर्षी या तलावात पावसाचे पाणी जमा झाले आहे. रविवारी सकाळी गावातील चेतन विलास राठोड (११) हा पोहण्याकरिता गेला. त्याला पोहणे नसल्यामुळे तो तलावात गटांगळ्या खाऊ लागला. तो बुडत असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेल्या रंजीत राठोड याने तलावात उडी घेतली. तलावात गाळ असल्याने दोघेही गाळात फसले. यामध्ये दोघांचाही बुडून मृत्यू झाला.तलावात दोघे बुडाल्याची वार्ता समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच काही गावकºयांनी याबाबत पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला माहिती दिली. माहिती मिळताच दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनात पथकाचे अजय जाधव, अंकुश सदाफळे, सागर आटेकर, ऋषिकेश तायउे, विक्की साटोटे, सनी इंगळे,राहुल जवके, चंद्रशेखर चव्हाण, ज्ञानेश्वर वेळुळकर यांनी तलावात बुडालेल्या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. (वार्ताहर)