तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कालावधीत २०१३ मध्ये अतिवृष्टीने दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेला १५ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. यामध्ये प्रशासनाने सात सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते प्रस्तावित केले होते. सिमेंट रस्त्यांमध्ये टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौकापर्यंतच्या रस्त्याचा समावेश होता. भविष्यातील वाढती वाहतूक समस्या लक्षात घेता मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी सिमेंट रस्त्यांच्या ‘वर्किंग एस्टीमेट’मध्ये बदल करून ते ३८ ते ४० फूट रुंद करण्याचा निर्णय घेतला. टॉवर चौकात रस्त्याची अरुंद जागा ध्यानात घेता रस्त्यालगतच्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जागेचे भूसंपादन करण्यासाठी प्रशासन सरसावले. परंतु एसबीआयने जागा देण्याच्या बदल्यात आर्थिक रकमेची मागणी करीत न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. तेव्हापासून मनपाने रस्ता रुंदीकरणाला ‘खाे’ दिल्याचे चित्र आहे.
निमा अराेरा यांच्याकडून अपेक्षा
आज राेजी टॉवर चौक ते हॉटेल स्कायलार्कपर्यंत अवघ्या चार मीटर रुंद व १०० मीटर लांबीच्या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. प्रशासनाने या रस्त्यासाठी ३ काेटी रुपये प्रस्तावित केले हाेते. हा तिढा निकाली काढण्यासाठी प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
१०० मीटर रस्त्याची लांबी
४ मीटर रस्त्याची रुंदी
३ काेटी रुपये केलेला खर्च