मूर्तिजापूर : तालुक्यातील कानडी येथून सोयाबीनची काढणी करुन बाजूला असलेल्या शेंद गावात ६ मजूरांसह ट्रॅक्टर घेऊन परत जात असताना विराहीत जवळ असलेल्या नाल्याला अचानक आलेल्या पुराने मळणी यंत्रासह ट्रॅक्टर वाहून घेतल्याची घटना १७ अॉक्टोबर रोजी संध्याकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान घडली, सुदैवाने ट्रॅक्टरवर असलेले ६ मजूर वाचले. शनिवार पासून सतत सुरु असलेल्या परतीच्या पावसाने तालुक्यात हाहाकार घातला आहे, या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे सोयाबीन काढणीची वेळ असल्याने सर्वत्र लगबग आहे. दरम्यान शेंद येथील शिवाजी जाधव यांनी महिन्यापूर्वी घेतलेला ट्रॅक्टर सोयाबीन काढणीसाठी कानडी बाजार येथे आला होता सोयाबीन काढून संध्याकाळी गावी परत जात असताना मूर्तिजापूर - पिंजर रस्त्यावर असलेल्या नाल्याच्या पुलावरून ट्रॅक्टर काढत असताना नाल्याच्या पुराचे पाणी अचानक वाढल्याने ट्रॅक्टर मळणी यंत्रासह नाल्यात उलटून वाहत गेला, दरम्यान चालकासह सहा मजूर ट्रॅक्टरवर बसलेले होते, घटनेचे गांभीर्य ओळखून ट्रॅक्टरवरील मजूरांनी पाण्यात उड्या घेऊन आपला जीव वाचविला, परंतु नवीन ट्रॅक्टर व मळणी यंत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने जीवीत हानी टळली.
नाल्याच्या पुरात मळणी यंत्रासह ट्रॅक्टर वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 6:53 PM