ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, सद्यस्थितीत मशागत ट्रॅक्टरद्वारे केली जात आहे. रबी हंगामात कांदा लागवडीची कामे सुरू असल्याने शेतकरी व्यस्त आहेत. दरम्यान, डिझेलचे दर गगनाला भिडल्याने परिणामी, ट्रॅक्टर मालकांना मशागतीचे दर वाढविण्याशिवाय पर्याय नाही.
हरणाच्या पाडसाला जीवनदान
खेट्री : आलेगाव वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत चान्नी येथील शेतकरी योगेश ताले यांच्या शेतातील विहिरीत हरणाचे पाडस पडल्याचे दिसून आले. त्यानंतर गावातील युवकांनी धाव घेत विहिरीतील हरणाच्या पाडसास बाहेर काढून जीवदान दिले.
शिरपूर परिसरात हिरव्या वृक्षांची कत्तल
खेट्री : पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी एकीकडे शासन वृक्ष लागवडीच्या विविध योजना राबवून कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. दुसरीकडे वन व महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे भरदिवसा हिरव्या वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे चित्र आहे. आलेगाव वन परिक्षेत्रातील शिरपूर परिसरात अवैध वृक्षतोड वाढली आहे. याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बीएसएनएलची सेवा ठप्प; ग्राहक त्रस्त!
पातूर : शहरातील बीएसएनएल सेवा ठप्प झाल्याने बँका व शासकीय कार्यालयातील कामकाज खोळंबले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष देऊन सेवा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.
अकोला-नांदेड मार्गाचे काम प्रगतीपथावर
पातूर : अकोला-नांदेड या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे; मात्र, नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्याच्या कामासाठी खोदकाम सुरू असल्याने नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
माळेगाव बाजार येथे रामजन्मभूमी गृहसंपर्क अभियान
माळेगाव बाजार : येथे रामजन्मभूमी अयोध्या श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान समितीच्यावतीने गावात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सरपंच संजयराव बगाडे, ग्रामपंचायत सदस्य व निधी समर्पण अभियान समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावलखेड-सांगळूद रस्त्याची दुर्दशा
सांगळूद : यावलखेड-सांगळूद रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्याने वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
--------------------------------
वन्य प्राण्यांचा धुमाकूळ; हरभऱ्याचे नुकसान
बार्शिटाकळी : तालुक्यातील विराहित शिवारात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ वाढला असून, पिकांचे नुकसान होत आहे. सध्या शेतशिवारात हरभऱ्याचे पीक बहरलेले आहे. रात्रीच्या सुमारास वन्य प्राणी शेतात जाऊन पिकांची नासाडी करीत आहेत.
अडसूळ-तेल्हारा रस्त्यावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ
मनात्री : अडसूळ-तेल्हारा रस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तेल्हारा-अडसूळ मार्गावर मनात्री परिसरात रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
बससेवा पूर्ववत करण्याची मागणी
हातरुण : हातरुण-धामणा बसफेऱ्या बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळेत पायी जावे लागते. त्यामुळे याकडे लक्ष देऊन ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अंत्री येथे कृषी सहाय्यक सतत गैरहजर
अंत्री मलकापूर : येथील कृषी सहाय्यक सतत गैरहजर राहत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गत काही दिवसांपासून कृषी सहाय्यक गावात फिरकलेच नसल्याने कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांना कृषी विभागात चकरा माराव्या लागत आहेत. अंत्री येथील कृषी सहाय्यक गावात फिरकत नसल्याने शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
उघड्यावर मांसविक्री; परिसरात घाणीचे साम्राज्य
आगर : गावातील वाॅर्ड क्रमांक एकमध्ये मुख्य रस्त्यालगत उघड्यावरच मांसविक्री केली जात असून, घाण रस्त्यात फेकली जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
कडोशी-कसुरा रस्त्याची दुरवस्था
बाळापूर : तालुक्यातील कडोशी-कसुरा रस्त्याची अतंत्य दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मार्गाने शेगाव येथे पायी जाणाऱ्या भाविकांची गर्दी असते. खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
एसटी बसस्थानकात येतच नाही!
निहिदा : येथून जवळच असलेल्या पिंजर येथील एसटी बस सेवा पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला; मात्र, एसटी बसस्थानकात येत नसून, बायपास परिसरातून निघून जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
पिंपळगाव चांभारे-पिंपळगाव फाटा रस्त्याची दुरवस्था
बार्शिटाकळी : तालुक्यातील पिंपळगाव चांभारे-पिंपळगाव फाटा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.
मजुरांची टंचाई; शेतकरी संकटात
बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागात तूर सोंगणीची लगबग सुरू आहे. सद्यस्थितीत तूर सोंगणी व कापूस वेचणीची कामे एकाच वेळी आल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.