अकोला: दिवसभरात जमा झालेली दीड लाखांची रोकड घेऊन मोटारसायकलने घरी जाणार्या व्यापार्याला तिघा चोरट्यांनी अडवून मारहाण करीत त्याच्याकडील रोकड लुटल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास एमआयडीसी फेज-३ मध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शहरातील बालाजीनगरात राहणारे मुरलीधर पभनदास गागनाणी(५५) यांची एमआयडीसी फेज-३ मध्ये मनीष ऑइल मिल आहे. मंगळवारी दिवसभरात जमा झालेली दीड लाखांची रोकड घेऊन ते एमएच ३0 एआर ३८0 क्रमांकाच्या मोटारसायकलने घराकडे निघाले. ते बीएसएनएल कार्यालयाजवळील रोडवर आले असताना, मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात तीन युवकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. गागणानी यांना अडवून प्लास्टिक पाइपने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. गागणानी हे खाली कोसळताच चोरट्यांनी त्यांच्याकडील दीड लाखांची रोकड असलेली बॅग हिसकली आणि ते पसार झाले. या रोडवर नेहमीच अंधार असतो. त्याचा फायदा चोरट्यांनी उचलला. जखमी झालेले मुरलीधर गागणानी हे झालेल्या प्रकारामुळे प्रचंड घाबरलेले होते. अशा अवस्थेतच त्यांनी घर गाठले. त्यांनी मुलाला घडलेली घटना सांगितल्यावर मुलाने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती धोक्याबाहेर आहे.
व्यापा-याला तिघांनी मारहाण करून लुटले!
By admin | Published: June 15, 2016 2:07 AM