भारतीय बौद्धमहासभा आणि वंचितच्यावतीने ५ डिसेंबरच्या मध्यरात्री कँडल मार्च काढून अशोक वाटिका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पारंपरिक पद्धतीने अभिवादन केले जात असते. कोविडच्या पार्श्वभूमीवर तसेच शासकीय निर्देशानुसार कँडल मार्च रद्द करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता तथा युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिली आहे.
दरवर्षी ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकोल्यात ५ डिसेंबरच्या मध्यरात्री टॉवर चौक ते अशोक वाटिका असा कँडल मार्च काढून रात्री १२ वाजून एक मिनिटानी अभिवादन केले जाते; मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा
अभिवादन कँडल मार्च काढू नये, असे बौद्ध महासभा व पक्षाच्यावतीने ठरविण्यात आले. राज्य शासनाने गर्दी टाळण्यासाठी दिलेले निर्देश पाहता हा अभिवादन मार्च रद्द केला असला तरीही अभिवादन करण्यास मोठ्या संख्येने अनुयायी अशोक वाटिका येथे येतात. त्यांना शिस्तीत व शारीरिक अंतर ठेवून प्रवेश देणे तसेच गर्दी होणार नाही, याची जबाबदारी पोलीस प्रशासनाने स्वीकारावी, असे आवाहनदेखील पदाधिकारी यांनी केले आहे.
सोबतच या वर्षीची अभुतपूर्व परिस्थिती पाहता घरूनच तसेच आपापल्या परिसरात आंबेडकरी अनुयायांना अभिवादन करण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे, महासचिव डॉ. एम. आर. इंगळे यांच्यासोबत वंचितच्यावतीने अरुंधती सिरसाट, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रमोद देंडवे,प्रदीप वानखडे, प्रभा सिरसाट,कलीम खान, शंकर इंगळे, वंदना वासनिक, राजकुमार दामोदर, प्रा. विजय आठवले यांनी संयुक्तरीत्या केले आहे. जिल्हा प्रशासनास भारतीय बौद्ध महासभा याबाबतीत उद्या पत्र देणार असून, अभिवादन कँडल मार्च रद्द करण्यात आल्याची नोंद सर्व आंबेडकरी अनुयायी यांनी घ्यावी असे, आवाहनदेखील राजेंद्र पातोडे यांनी केले आहे.