अकोला : रस्ता सुरक्षा सप्ताहात ऑटाेचालकांना मार्गदर्शन केल्यानंतरही जे ऑटाेचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, त्यांच्यावर आता वाहतूक शाखेने कारवाईसाठी कंबर कसली आहे. शहरातील ४० ऑटाेंवर एकाच दिवसात कारवाई करण्यात आली असून ही माेहीम सुरूच राहणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांनी दिला आहे.
शहरात आवश्यकतेपेक्षा खूप जास्त ऑटो धावतात. एवढ्या मोठ्या संख्येने धावणाऱ्या ऑटोेंमुळे वाहतूक नियंत्रित करण्यावर खूप ताण पडतो. अशातच शहरातील निर्माणाधीन रस्ते, उड्डाणपूल यामुळे रस्त्यांची खस्ता हालत झाल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पाेलिसांना आटापिटा करावा लागताे. त्यामुळे रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी शहरातील ऑटोचालकांना वाहतूक नियम पाळण्याविषयी मार्गदर्शन केले. बैठका घेऊन त्या माध्यमातून प्रथम प्रबोधन केले, परंतु फक्त प्रबोधन करून न थांबता वाहतूक नियमभंग करणारे, रस्त्यात कोठेही ऑटो थांबवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे, दंडात्मक कारवाईची रक्कम बाकी ठेवणा-या ऑटोचालकांच्या ऑटो पकडून कार्यालयात लावण्याची धडक मोहीम शनिवारपासून सुरू करण्यात आली. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी जवळपास ४० ऑटो वाहतूक कार्यालयात लावण्यात आल्या आहेत. ऑटोच्या चालकांना एकत्रित करून त्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याची तंबी देण्यात आली. तसेच चलन बाकी असलेल्या ऑटोचालकांकडून दंडाची पूर्ण रक्कम भरून घेण्यात आली. दंड न भरणारे ऑटो वाहतूक कार्यालयात थांबवून ठेवण्यात आले आहेत. त्यांना तातडीने दंड जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दंड न भरल्यास ऑटाे कार्यालयातच ठेवण्याचा इशारा वाहतूक शाखाप्रमुख गजानन शेळके यांनी दिला आहे.