अकोला : वाहन चालविताना मोबाइल फोनवर बोलणे, ट्रिपलसिट वाहन चालविणे, सिग्नल तोडून भरधाव जाणे; वाहतूक नियमांचे नेहमीच होणारे अशा प्रकारचे उल्लंघन वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीवावर बेतल्याच्या घटना शहरात नेहमीच घडतात. वाहनचालक या घटनांमधून कोणताही बोध घेताना दिसत नाहीत. भर चौकात उभे राहणारे आॅटो, वाढते अतिक्रमण तसेच फेरीवाल्यांमुळेही वाहतुकीची कोंडी होते.अकोल्याला बेताल वाहतुकीने विळखा घातला आहे. वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांमध्येही इच्छाशक्ती हवी. अपघातांमध्ये अनेकांचा बळी जातो. अपंगत्वसुद्धा येते. उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि महामार्ग व शहर वाहतूक पोलिसांकडून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती होण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते; मात्र या अभियानाचा अपेक्षेनुसार फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे हे आपल्याच सुरक्षेसाठी आवश्यक आहे, ही जाणीव वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये होणे आवश्यक आहे. त्यानुसार त्यांनी नियमांचे पालनही करणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी पोलिसांनी दंड करणेही आवश्यक आहे.
जड वाहनांचे अनधिकृत ‘पार्किंग झोन’शहरात नियमबाह्यपणे प्रवेश करणाºया जड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ट्रक कुठेही उभे करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. जड वाहने उभी केल्याने हाणामारीच्या घटनाही घडतात. फतेह चौक ते दामले चौक, बाळापूर रोड-भांडपुरा, अकोट स्टँड, रेल्वेस्थानक परिसरासत ट्रक मोठ्या प्रमाणात उभे असतात. जड वाहने उभी करण्यासाठी एमआयडीसी परिसरात जागा उपलब्ध (ट्रान्सपोर्टनगर ) करून देण्यात आली आहे; मात्र या ठिकाणी कोणीच जड वाहने उभी करीत नाहीत. मध्यंतरी जड वाहने उभी करणाºयांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविण्यात आली होती. आता परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.आपलीही जबाबदारी महत्त्वाची!वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी आपलीही आहे, याची जाणीव किती जणांना आहे, निव्वळ प्रशासकीय यंत्रणेला दोष देऊन चालणार नाही. जबाबदार नागरिक म्हणून आपण कधी वागण्याचा प्रयत्न करतो का, असे अनेक प्रश्न बेताल वाहतूक पाहिली की उपस्थित होतात. वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी आहे; परंतु आम्ही वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतो. सिग्नल न पाहताच थेट दुचाकी, चारचाकी दामटतो.