वाडी अदमपूर : तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर-इसापूर मार्गावरील नागझरी नदीवर बांधलेला रपटा पुराच्या पाण्यामुळे खचल्याने काही काळासाठी गावाचा संपर्क तुटला होता. सद्य:स्थितीत मार्गावर मोठे भगदाड पडले असून, रस्त्याच्या मधोमध खड्डे पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. याकडे जि. प. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
वाडी अदमपूर गावाच्या मध्यभागातून नागझरी नदी वाहते. वाडी अदमपूर-इसापूर या मार्गावरील नागझरी नदीच्या पात्रावर गेल्या काही वर्षांपूर्वी रस्त्याचे काम केले होते. पावसाळ्यात नदीला आलेल्या पुरामुळे दरवर्षी रस्ता खचून जातो. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यावर्षी पावसाच्या सुरुवातीलाच नदीला आलेल्या पहिल्याच पुरात रपटा एका बाजूने पूर्ण खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
-----------------------------
नदीला आलेल्या पुरामुळे रपटा पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून, नागरिकांना ये-जा करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. रपटा दुरुस्तीसाठी जि. प. स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
- रूपेश राठी, सरपंच, वाडी अदमपूर.
------------------------
दोन ते तीन वर्षांपूर्वीपासून रस्त्यावरील रपटा खचला आहे. रपटा दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन रपट्याची दुरुस्ती करावी.
-मीराताई आनंद बोदडे, सरपंच, ग्रा.पं. इसापूर
-----------------
नागझरी नदीवरील रपट्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा, याकरिता जि.प. बांधकाम विभागाकडे मागणी केली; परंतु कोरोनामुळे निधी उपलब्ध झाला नाही. निधी उपलब्ध होताच दुरुस्ती करण्यात येईल.
- धनंजय बरडे, उपविभागीय अभियंता, जि. प. बांधकाम विभाग, अकोट.