लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट - अकोला मार्गावर वादळी वार्यासह पाऊस झाला. त्यामुळे देवरी फाट्यादरम्यान वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील विविध भागात वादळी वार्यासह पाऊस पडत आहे. ९ जून रोजी तांदूळवाडी, देवरी फाटा परिसरात जोराचा पाऊस झाला. त्यामुळे अकोला मार्गाच्या दु तर्फा असलेली अनेक झाडे उन्मळून पडल्याने तब्बल दोन ते तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये एक रुग्णवाहिकासुद्धा अडकून पडली होती. परिस्थितीचे गांभीर्य पाहता, रस्त्यावरील झाडे उचलण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी पोहचण्यापूर्वीच दहीहांडा व अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वाहतूक पोलीसांनी वाहनांना वाट मोकळी करून दिली, तर रुईखेड परिसरात केळी बागांना वादळी वार्यासह पावसाचा तडाखा बसला आहे. या भागाची पाहणी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह केली. अकोट - अकोला मार्गावर पावसाळ्याच्या दिवसात नेहमीच वाहनाधारकांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत या मार्गावर पावसाळ्याच्या दिवसात सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभागाने संयुक्त नैसर्गिक आपत्ती निवारण पथक तैनात करण्याची मागणी परिसरातील गावकर्यांसह वाहनधारकांनी केली आहे.
अकोट-अकोला मार्गावर वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्प
By admin | Published: June 10, 2017 2:26 AM