अशोक वाटिका चौकात अपघाताची शक्यता
अकोला: अशोक वाटिका चौकात उड्डाण पुलाचे काम सुरू असून, एका बाजूला खोदकामदेखील करण्यात आले आहे. हा चौक जोखमीचा ठरत असला, तरी येथून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. धूळ आणि वाहतुकीच्या कोंडीसोबतच येथे नेहमीच अपघाताचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
उड्डाणपुलाखाली किरकोळ व्यावसायिक
अकोला: शहरातून जाणारा उड्डाण पूल निर्माणाधीन आहे. असे असतानाही या पुलाखाली किरकोळ व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. शिवाय, अनेक जण याखाली वाहनेदेखील पार्किंग करत असल्याचे निदर्शनास येते. हा प्रकार धोकादायक असून, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
थंडीमुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ
अकोला: मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दिवसाच्या आणि रात्रीच्या वातावरणात बदल होत असल्याने अनेकांना सर्दी, खोकल्याचे आजार उद्भवू लागले आहेत. ज्यांना दम्याचा आजार आहे, अशा रुग्णांचा त्रास वाढला आहे. अशा रुग्णांनी स्वत:ला जपण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
ट्राफिक सिग्नलची प्रतीक्षा
अकोला: शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मुख्य रस्त्यांवर पांढरे पट्टे मारण्यात आले; परंतु अद्यापही ट्राफिक सिग्नल लावण्यात आले नाही. त्यामुळे वाहनधारक मुख्य चौकातूनही वेगाने वाहने चालवत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शहरातील मुख्य चौकांमध्ये ट्राफिक सिग्नल सुरू करण्याची गरज आहे.
भरधाव लक्झरी बस देताहेत अपघातास निमंत्रण
अकोला: रात्रीच्या वेळी अशोक वाटिका ते सरकारी बगीचा या मार्गावरून लक्झरी बसेस भरधाव जातात. दरम्यान, या मार्गावर परिसरातील नागरिकांची गर्दी असते. परिणामी, भरधाव जाणाऱ्या लक्झरी बसेसमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे नेहरू पार्क येथून रस्ता बंद करण्यात आल्याने या बसेस शहरातून येत आहेत.