लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा साठा घेऊन जात असलेल्या एका ओमनी कारला अडवून त्यामधील २ लाख ५० हजार रुपयांचा गुटख्याचा साठा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी जप्त केला. ही कारवाई अकोट स्टॅन्ड परिसरात करण्यात आली असून, वाहतूक शाखेच्या पोलिसांची गुटखा जप्तीची ही दुसरी कारवाई आहे.वाहतूक शाखेचे पोलीस शुक्रवारी सकाळी अकोट स्टॅन्ड चौकात नाकाबंदी करीत असताना यावेळी एमएच २६-४५३२ क्रमांकाची ओमनी व्हॅन जात असताना पोलिसांनी या वाहनाची झडती घेतली. यामध्ये राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला २ लाख ५० हजार रुपयांचा चार पोत्यांमध्ये भरलेला गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत तन्वीर खान हसन खान, वय २६ वर्षे रा. बैदपुरा व पवन विठ्ठल बुंधे वय २१ वर्षे रा. कौलखेड या दोघांना ताब्यात घेतले आहे. सदरचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाकडे देण्यात आला असून, त्यांनी गुटखा जप्त केला. ही कारवाई वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.पोलीस ठाण्यांची दुकानदारीशहरातील सातही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गुटख्याची खुलेआम वाहतूक होते. याकडे संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. एकाही पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अद्याप गुटखा जप्त करण्यात आला नसल्याचे यावर पोलिसांच्या हप्तेखोरीवर शिक्कामोर्तब झाला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वेळा विशेष पथकाने तब्बल २५ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला; मात्र सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गोरखधंदा सुरू असताना त्यांना एकदाही हा गुटखा साठा न दिसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
वाहतूक पोलिसांकडून गुटखा साठा जप्त
By admin | Published: July 08, 2017 2:17 AM