अकोला: विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघातील १४५ संवेदनशील मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची (मायक्रो ऑब्झर्वर) नियुक्ती करण्यात आली आहे. या सूक्ष्म निरीक्षकांना शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृह येथे प्रशिक्षण देण्यात आले. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व आणि मूर्तिजापूर या पाच मतदारसंघातील १ हजार ४८0 मतदान केंद्रांवर १५ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. पाचही मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांपैकी १२१ मतदान केंद्र संवेदनशील, २२ अतिसंवेदनशील व दोन क्रिटिकल, असे एकूण १४५ संवेदनशील मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान, या संवेदनशील मतदान केंद्रांवरील घडामोडींवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी या संवेदनशील मतदान केंद्रांवर प्रत्येकी एक याप्रमाणे १४५ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात आली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदान प्रक्रिया पार पडावी, याबाबत सूक्ष्म निरीक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक आर.सेल्वन, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, उपजिल्हाधिकारी उदय राजपूत, उपजिल्हाधिकारी एम.डी.शेगावकर, अकोला पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी सूक्ष्म निरीक्षकांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाला संवेदनशील मतदान केंद्रांवर नियुक्ती करण्यात आलेले १४५ सूक्ष्म निरीक्षक उपस्थित होते.
संवेदनशील मतदान केंद्रांवरील सूक्ष्म निरीक्षकांना प्रशिक्षण
By admin | Published: October 12, 2014 1:08 AM