- संजय खांडेकर
अकोला: मध्य रेल्वेच्या दोन विभागात रेल्वे आॅटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टिम लागू करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे आता भुसावळ-नागपूरदरम्यान सिग्नलद्वारे लगेच मार्गस्थिती मिळेल. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांचा वेळ वाचणार आहे.मंगळवार १३ आॅगस्ट १९ रोजी ही यंत्रणा लावली गेली आहे. बडनेरा-वरणगाव स्टेशन आणि भुसावळ-वरणगाव स्टेशनदरम्यान महत्त्वपूर्ण सिग्नलिंग कार्यप्रणाली कार्यान्वित झाल्याने रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे भुसावळहून नागपूरकडे धावणाºया सर्व गाड्यांची स्थिती लगेच रेल्वे यंत्रणेला मिळणार आहे. त्यामुळे रेल्वेगाड्या तातडीने पुढे सोडल्या जाणार आहे. भुसावळ आणि वरणगावच्या डाउन दिशेकडे ६ आणि अप दिशेने ७ नवीन सिग्नल कार्यान्वित झाले आहे. १३ ही सिग्नल आॅटोमेटिक पद्धतीने कार्य करणार असल्याने रेल्वे विभागाचे काम अधिक सुलभ झाले आहे. भुसावळ-जळगावदरम्यान आॅटोमॅटिक सिग्नलद्वारेच कार्य चालते; मात्र त्यापलीकडे आॅटोमॅटिक सिग्नल कार्यरत नव्हते. त्यामुळे पुढील मॅसेज आणि संकेत मिळाल्याशिवाय गाड्या सोडल्या जात नसत. आता मात्र भुसावळ-नागपूरदरम्यान धावणाºया रेल्वे गाड्यांची गती वाढणार आहे. सोप्या भाषेत भुसावळ आणि वरणगावदरम्यान केवळ एका गाडीचे सिग्नल पूर्वी मिळायचे; मात्र आताच्या नवीन यंत्रणेत पाच ते सहा गाड्यांची स्थिती अद्ययावत सिग्नल दर्शविणार आहेत. त्यामुळे कोणत्या ट्रकवरील ट्राफिक कुठे वळवायची, याचे निर्णय आता लगेच घेणे सोपे होणार आहे. आधी तसे ठरवित येत नसे. त्यामुळे भुसावळ आणि बडनेरासारख्या ठिकाणी गाड्या तासन्तास थांबवून ठेवल्या जायच्या. आता मात्र यातून सुटका झाली आहे.ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी भुसावळ डीआरएम विवेक कुमार, अपर मंडळ रेल्वे प्रबंधक मनोज सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली लावली गेली आहे. यासाठी राजेंद्र पोतदार वरिष्ठ मंडळ सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, मनोज दीक्षित, निशांत द्विवेदी, स्वप्निल नीला यांनी अथक परिश्रम घेतले आहे.