- आशिष गावंडे
अकोला : महापालिक ा शाळेसाठी विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबविण्याच्या नियोजनाला बाजूला सारत काही कामचुकार शिक्षकांना बदल्यांचे वेध लागले आहेत. घराजवळ असणाऱ्यां अपेक्षित शाळेत बदली करून घेण्यासाठी चक्क लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. बदलीच्या माध्यमातून स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्यासाठी शिक्षण विभागाला खतपाणी घालण्याचे काम मनपातील एक वरिष्ठ अधिकारी करीत असल्याने पुन्हा एकदा शिक्षण विभागात बेबंदशाही निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.शहरातील खासगी कॉन्व्हेंटच्या महागड्या शिक्षणाला पर्याय म्हणून महापालिकेच्या शाळांकडे पाहिल्या जाते. कधीकाळी मनपाच्याच शाळेमधून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनी पुढे यशाचे झेंडे रोवल्याचे कोणीही नाकारत नाही. यादरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शिक्षक व शिक्षक संघटनांच्या मनमानीला आवार घालण्याची जबाबदारी असणाºया शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेण्याच्या नादात संघटना व शिक्षकांना रान मोकळे करून देताच महापालिकेच्या शिक्षण प्रणालीला घरघर लागल्याचे चित्र आहे. घराजवळ असणाऱ्या शाळेत मागील १५-१५ वर्षांपासून काही शिक्षकांनी ठाण मांडले होते. अपेक्षित शाळेवर बदली करून घेण्यासाठी व झालेली बदली थांबवण्यासाठी सर्रासपणे आर्थिक व्यवहार पार पडत होते. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके यांनी २०१६ मध्ये पहिल्यांदा एकाच ठिकाणी ठाण मांडणाºया शिक्षकांच्या बदल्या केल्या. २०१६ मध्ये १५ ते २० वर्षांपासून एकाच शाळेत कार्यरत असणाºया ७६ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये एकाच शाळेवर पाच ते दहा वर्षांपर्यंत कार्यरत राहणाºया ७४ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यंदा मनपा आयुक्त जितेंद्र वाघ निकषानुसार बदली करणार की नाही, याबद्दल संभ्रम असला तरी प्रशासनाने यापूर्वी केलेल्या बदल्या रद्द करून पुन्हा अपेक्षित शाळांमध्ये रूजू होण्यासाठी काही शिक्षकांना वेध लागले आहेत.