लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिका आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय शिक्षण विभागाने केलेल्या ३१ शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याचा आदेश मंगळवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जारी केला. आयुक्तांच्या निर्णयामुळे बदली झालेल्या शिक्षकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.महापालिकेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांवरील शिक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपात बदल्या करण्यात आल्या होत्या. या दोन्ही माध्यमातील काही शिक्षकांच्या बदल्यांना मनपा प्रशासनाने मंजुरी दिली होती; परंतु सोमवारी या शिक्षकांच्या बदल्यांची फाइल मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मागविली होती. त्याची तपासणी केल्यावर सर्व बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महापालिकेच्या एकाच शाळेत चक्क २० ते २२ वर्षे ठाण मांडून बसणाऱ्या शिक्षकांच्या मनमानी कारभारामुळे शिक्षणप्रणालीचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे बदल्याचा बडगा उगारताच असे ‘लॉबिंग’ करतात. यंदा मर्जीतल्या शिक्षकांच्या बदलीसाठी शिक्षण विभागाकडे मनपा पदाधिकारी व नगरसेवकांच्या शिफारशींचा अक्षरश: पाऊस पडला होता. तसेच चालू शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी बदलीसाठी दबावतंत्राचा वापर सुरू केला होता. त्यामुळे ज्या शिक्षकांच्या नियुक्तीला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला, त्यांची प्रशासन व शिक्षण विभागाने बदली केली होती; परंतु या शिक्षकांच्या बदल्यांची फाइलच मनपा आयुक्त कापडणीस यांनी मागवून तपासणी केल्यावर या बदल्या रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पदाधिकारी, नगरसेवकांच्या शिफारशी अंगलटमर्जीतल्या शिक्षकांच्या बदल्याणसाठी मनपातील काही पदाधिकारी, नगरसेवकांनी शिक्षण विभागाकडे पत्राद्वारे शिफारशी केल्या होत्या. ह्या शिफारशी शिक्षण विभागाच्या अंगलट आल्याचे बोलल्या जात आहे.
शाळांचे नियोजन कोलमडले!मनपाच्या शाळेतील २४ शिक्षकांच्या बदल्या होणार होत्या. शिक्षण विभागाने ३१ शिक्षकांच्या बदल्या केल्याची माहिती आहे. यामुळे अनेक शाळांचे नियोजन कोलमडले. ही प्रक्रिया उपायुक्त विजयकुमार म्हसाळ, शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी पार पाडली.
आशा प्रवर्तकांच्या नियुक्त्या रद्दमनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने १२ आशा प्रवर्तकांच्या केलेल्या नियुक्त्या नियमबाह्य ठरवत आयुक्त संजय कापडणीस यांनी सदर नियुक्त्या रद्द करण्याचा आदेश जारी केला. आरोग्य विभागाने प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय ‘आशा’ची नियुक्ती केल्याची माहिती आहे.