अकोला : महावितरण कंपनीच्या अकोलासह राज्यातील पाच विविध परिमंडळांच्या मुख्य अभियंत्यांची प्रशासकीय कारणावरून त्याच पदावर बदली करण्यात आली. तर विविध परिमंडळांमधील अधीक्षक अभियंत्यांना मुख्य अभियंतापदावर बढती देण्यात आली. महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगढ मुख्यालयातून बदली व बढतीचे आदेश बुधवार, ३० नोव्हेंबर रोजी काढण्यात आले.
पुणे परिमंडळाचे सचीन लक्ष्मीकांत तालेवार यांची औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून बदली करण्यात आली. औरंगाबाद परिमंडळाचे भूजंग बळीराम खंडारे यांना कॉर्पोरेट कार्यालयाचे (प्रकल्प) मुख्य अभियंता म्हणून पाठविण्यात आले. अकोला परिमंडळाचे अनिल गुरुदत्त डोये यांची बदली नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून करण्यात आली. नांदेड परिमंडळाचे दत्तात्रय विष्णू पडळकर यांना कार्पोरेट कार्यालयात बदली देण्यात आली. अमरावती परिमंडळाच्या पु्ष्पा रामचरण चव्हाण यांची बदली गोंदिया परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी करण्यात आली.
पाच अधिक्षक अभियंत्यांना मिळाली बढतीअकोला परिमंडळात रिक्त झालेल्या मुख्य अभियंता पदावर पायाभूत आराखडा (इन्फ्रा)चे अधीक्षक अभियंता अनिल वाकोडे यांना बढती देण्यात आली आहे. पुणे ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांना पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून बढती मिळाली. कमर्शियल/ फ्री ॲक्सेस सेलचे अधीक्षक अभियंता ज्ञानेश कुळकर्णी हे अमरावती परिमंडळाचे, फ्रँचायझी सेलचे अधीक्षक अभियंता प्रवीण परदेशी कॉर्पोरेट कार्यालयाचे, तर अहमदनगर मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनिल काकडे हे भांडुप शहर परिमंडळाचे मुख्य अभियंता असतील.