वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यासाठी युवा कार्यकर्ते सुगत डोंगरे यांनी १९ सप्टेंबर २०२० रोजी निवेदन सादर केले होते. त्याची दखल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी घेत, जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठपुरावा केला. परंतु त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाला मान्यता मिळाली नाही. वाडेगावात ग्रामीण रुग्णालय उभारण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार (वसो) यांनी कायद्याच्या चौकटीत राहून, पत्रव्यवहार केला व पत्रात सांगितलेल्या ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयासाठी जिल्हा परिषदेचा ठराव आवश्यक असून, जिल्हा नियोजन समितीचा अहवाल किंवा ठराव व इतर गोष्टींचा पाठपुरावा केला तरच वाडेगावमध्ये ग्रामीण रुग्णालय होऊ शकते. असे अभिप्राय दिला होता. त्या पत्रानुसार सुगत डोंगरे यांनी १५ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी यांना पुन्हा वरील बाबी पूर्ण करून तसेच जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये सदरचा ठराव मंजूर करण्याची मागणी केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता वाडेगावात प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्याची मागणी जोर धरत आहे.
रुग्णालय झाले, रुग्णांना मिळतील उपचार
वाडेगावमध्ये ग्रामीण रुग्णालय झाले तर परिसरातील ग्रामस्थांना योग्य उपचार मिळतील. सर्पदंश, अपघातग्रस्त, गरोदर माता, किरकोळ आजारांवर नागरिकांना तात्काळ सुविधा मिळू शकतील. सद्यपरिस्थिती प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार उपलब्ध नाहीत. त्यासाठी अकोल्यात यावे लागते.
जिल्हा परिषद प्रशासन उदासीन
वाडेगावामध्ये ३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचा पुढाकार महत्त्वाचा आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने सभेमध्ये ग्रामीण रुग्णालय निर्मितीबाबत ठराव घेऊन जिल्हा नियोजन समितीकडे पाठवावा. परंतु जिल्हा परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी उदासीन असल्यामुळे कोणीच ठरावासाठी पुढाकार घेतला नाही.