शेतकऱ्यांना कमी खर्चाचे तंत्रज्ञान मिळावे याकरिता डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केले असून, सोयाबीन पिकांमध्ये चार वर्षांत चार वाण विकसित केले. २०१८ मध्ये एएमएस १००१ (पीडीकेव्ही येलो गोल्ड), २०१९ मध्ये सुवर्ण सोया, २०२० मध्ये पीडीकेव्ही पूर्वा आणि २०२१ मध्ये एएमएस १००-३९ (पीडीकेव्ही अंबा) हे वाण प्रसारित झाले आहे. यातील सुवर्ण सोया हे वाण मध्य भारतासाठी आहे. या वाणाचा बियाणे साखळीत अंतर्भाव केला आहे.
वातावरणात वारंवार बदल होत असल्याने हवामानास असे अनुकूल एएमएस १००-३९ (पीडीकेव्ही अंबा) हे वाण विद्यापीठाने विकसित केले आहे. हे वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आले आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात व बुंदेलखंड या पाच राज्यांसाठी हे वाण तयार करण्यात आले आहे. मुडकूज, खोडकूज, खोडमाशी व चक्रीभुंगा या रोगास प्रतिबंधक, ९५-९७ या कमी दिवसाच्या कालावधीत येणारे वाण आहे. हे वाण लवकरच शेतकऱ्यांना लागवडीसाठी मिळणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
--बॉक्स--
२५ टक्के अधिक उत्पन्न
क्रांतिकारक बदल घडून आणणारे एएमएस १००-३९ (पीडीकेव्ही अंबा) हे वाण इतर वाणांपेक्षा २५ टक्के अधिक उत्पन्न मिळवून देणारे आहे.
--कोट--
शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील हवामानास अनुकूल असे वाण तयार करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार एएमएस १००-३९ (पीडीकेव्ही अंबा) हे वाण विकसित केले आहे. हे वाण विद्यापीठाचे मोठे यश आहे.
- डॉ. व्ही.के. खर्चे, संशोधन संचालक, डॉ. पंदेकृवि, अकोला
--कोट--
विद्यापीठाचे तीन वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित झाले आहे. एएमएस १००-३९ हे वाण लवकर येणारे व मोठा दाणा असलेले आहे. शेतकऱ्यांना पाहण्यासाठी हे वाण अमरावतीच्या प्रक्षेत्रावर उपलब्ध आहे.
- डॉ. सतीश निचड, सोयाबीन पैदासकार व प्रमुख, प्रादेशिक संशोधन केंद्र, डॉ. पंदेकृवि