कारंजा लाड (जि. वाशिम): यंदा अवर्षणामुळे राज्यभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, सर्वत्र पाणीटंचाईची समस्या तीव्र रूप धारण करीत आहे. या पृष्ठभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. हाच विचार करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरातील अडीचशे आगार व प्रशासकीय कार्यालयांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. यंदा सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विविध संस्था, संघटना पाणीबचतीचे आवाहन करीत आहेत. यासाठी आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही पुढाकार घेतला आहे. प्रत्येक आगारात बसगाड्या धुणे, कर्मचारी निवास स्वच्छ करणे यासह प्रत्येक बसस्थानकावर प्रसाधनगृहात मोठय़ा प्रमाणात पाण्याचा वापर होतो. या सर्व बाबींसाठी पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास मोठय़ा प्रमाणात पाण्याची बचत होऊन त्याचा वापर इतरांसाठी करता येऊ शकतो, हे लक्षात घेऊन एसटी महामंडळाने सर्व आगार आणि प्रशासकीय कार्यालयांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नळ सुव्यवस्थित ठेवणे, पाण्याची गळती थांबविणे, पाण्याचे स्रोत स्वच्छ व प्रदूषणरहित ठेवणे, चालक-वाहकांच्या वेळोवेळी बैठका घेऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे, तसेच बस स्थानकावरील पिण्याच्या पाण्याचा केवळ प्रवाशांच्या उपयोगासाठी वापर करणे आदी महत्त्वपूर्ण निर्देशांचाही समावेश आहे. एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होणार, हे गृहीत धरून महामंडळाच्या सर्व कर्मचार्यांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे.
पाण्याच्या बचतीसाठी परिवहन महामंडळाचा पुढाकार!
By admin | Published: April 09, 2016 1:34 AM