लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जग झपाट्याने बदलत आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम असून, सर्वच व्यवसायांमध्ये स्थित्यंतर होत आहेत. बदलत्या काळाची गरज ओळखून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनीही या क्षेत्रात होणारे बदल अंगीकारले पाहिजे, असा सल्ला महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस वाहतूक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मोहिंदसिंग घुरा यांनी दिला आहे. ट्रान्सपोर्ट व मोटर्स व्यावसायिकांच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी अकोल्यात आलेल्या ७५ वर्षीय मोहिंदरसिंग घुरा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ट्रान्सपोर्ट व्यवसायातील विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. या व्यवसायातील बदलत्या स्वरूपाबाबत बोलताना ते म्हणाले, की इतर सर्वच व्यवसायांप्रमाणे ट्रान्सपोर्ट व्यवसायातही बदल घडत आहेत. त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व वाहन मालकांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा अंगीकार केला पाहिजे. तसेच या व्यवसायाशी निगडित नियम व कायद्यांमध्ये होणाऱ्या बदलांची अद्ययावत माहिती ठेवली पाहिजे, असेही घुरा म्हणाले.राज्य व देशाच्या विकासासाठी ट्रान्सपोर्ट महासंघाकडून सत्तेत असलेल्या सरकारला पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल. महासंघाचे ४ प्रमुख नियम असून, यापैकी एक महत्त्वाचा नियम म्हणजे सरकारला सहकार्य करणे हा आहे, असे घुरा यांनी बोलताना सांगितले. देशात वाहनचालकांची कमतरताभारतात वाहनचालकांची कमतरता असल्याचा दावा यावेळी घुरा यांनी केला. देशात वाहनचालकांची संख्या कमी असल्यामुळे ८० टक्के वाहनमालकांना स्वत:च त्यांची वाहने चालवावी लागत आहेत. जड वाहनांवर क्लिनर म्हणून काम करणाऱ्यांनाही प्रशिक्षणार्थी परवाना जारी केला पाहिजे, जेणेकरून नवीन चालक तयार होतील, असे घुरा म्हणाले.आधार कार्डवर मिळावा जामीनअपघातप्रकरणी कारवाई झाल्यास वाहनचालकाला जामीन मिळविण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. अलीकडच्या काळात आधार कार्डला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे चालकांना आधार कार्ड दाखवून जामीन मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा घुरा यांनी व्यक्त केली.चालकांची अपूर्ण झोप अपघाताचे मुख्य कारणमहामार्गांवर अपघातांची संख्या वाढत आहे. याचे मुख्य कारण काय असावे, या प्रश्नाच्या उत्तरादाखल घुरा यांनी अपूर्ण झोप हे मुख्य कारण असल्याचे सांगितले. वाहनचालकांना ठरावीक मुदतीत दिलेल्या स्थळी पोहचावे लागते. यासाठी दिवस-रात्र एक करतात. रात्री पूर्ण झोप झाली नाही, तर वाहनचालकाला झोप येणे साहजिक आहे. त्यामुळेच महामार्गांवरील अपघात वाढत आहेत, असे घुरा म्हणाले.
ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी बदलांचा स्वीकार करावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:23 AM