अकोला : कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर गत दोन वर्षांपेक्षाही अधिक काळापासून बंद असलेली रेल्वेची जनरल तिकिटांची सुविधा बुधवार, २९ जूनपासून पुन्हा बहाल करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सर्वच लहान-मोठ्या स्थानकांवर आता बुधवारपासून बुकिंग खिडक्यांवर अनारक्षित तिकीट काढून रेल्वेच्या जनरल डब्यांमध्ये प्रवास करता येणार आहे. आरक्षित तिकिटांची सक्ती आता संपणार असल्यामुळे दैनंदिन प्रवास करावा लागणाऱ्या प्रवाशांची आरक्षित तिकिटांची कटकट संपणार आहे.
कोरोनाकाळात प्रभावित झालेली रेल्वेची प्रवासी वाहतूक आता पूर्णपणे सुरळीत झाली असून, सर्व गाड्याही नियमित झाल्या आहेत. तथापि, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद असलेली रेल्वेची जनरल तिकीट विक्री मात्र बंदच ठेवण्यात आली होती. आरक्षित तिकिटधारकांनाच प्रवासाची मुभा होती. त्यामुळे सामान्य प्रवाशांची मोठी गाेची होत होती. कोरोना संसर्गाची स्थिती आता नियंत्रणात असल्याने रेल्वेने हळूहळू सर्वच सुविधा बहाल करण्याच्या श्रृंखलेचा पुढील भाग म्हणून २९ जूनपासून सर्वच रेल्वेस्थानकांवरील बुकिंग खिडक्यांवरून अनारक्षित तिकीट विक्रीची सुविधा प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना आता अकोला जिल्ह्यातील मध्य रेल्वेच्या सर्वच लहान-मोठ्या स्थानकांवरून सर्वच गाड्यांची जनरल तिकीट काढता येणार असून, त्या तिकिटांवर जनरल डब्यांमध्ये प्रवास करता येणार आहे. अनारक्षित तिकीट बुकिंगसाठी रेल्वे प्रशासनाद्वारे काही निवडक स्थानकावर एटीव्हीएम द्वारे तिकीट काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय यू टी एस ॲप द्वारे प्रवासी आपले तिकीट बुक करू शकतात.
मासिक पास व अन्य सवलती बंदच
येत्या २९ जूनपासून जनरल तिकीट विक्रीची सुविधा पुन्हा सुरू होणार असली, तरी मासिक पास इतर सवलती मात्र बंदच असणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, विविध राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नागरिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार यांना तिकिटात मिळणाऱ्या सवलतीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे. सध्या दिव्यांगांना मिळणारी सवलत मात्र कायम आहे.
मंगळवारच्या मध्यरात्रीपासूनच भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवर जनरल तिकीट विक्री सुविधा प्रारंभ होणार आहे. रेल्वे प्रवासात सवलतपात्र प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतींबाबत मात्र अजुन कोणताही निर्णय झालेला नाही.
- जीवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी, भुसावळ विभाग, मध्य रेल्वे.
बुकिंग खिडक्यांवरून जनरल तिकीट काढण्याची सुविधा पुन्हा सुरु होत आहे, हे ऐकूण आनंद झाला. ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलतही सुरू करण्यात यावी, अशी अपेक्षा आहे.
- केशवराव गायकवाड, प्रवासी, अकोला