आगारात एकूण बस
५२
सध्या सुरू असलेल्या बस
२०
एकूण कर्मचारी
३४०
वाहक
११४
चालक
११८
एसटीची सर्वाधिक वाहतूक अमरावती मार्गावर
निर्बंध शिथिल झाल्यानंतर एसटी महामंडळाने अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक सुरू केली आहे. यामध्ये १ जून पासून काही फेऱ्या शेड्यूल केल्या आहे.
शहरातील मध्यवर्ती आगारातून दररोज सर्वाधिक फेऱ्या अमरावती मार्गावर सोडण्यात येत आहेत. या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.
त्यानंतर बुलडाणा, खामगाव, यवतमाळ येथेही फेऱ्या सोडण्यात येत आहेत. नागपूर, जळगाव, खान्देश बससेवा सुरू करण्यात आली आहे.
दररोज बस सॅनिटाईज
आगारातून बस फलाटवर लागण्याआधी संपूर्ण बस सॅनिटाईज केल्या जात आहेत. दिवसातून एकवेळ ही बस सॅनिटाईज करण्यात येत असून याकरिता सोडियम हायप्रोक्लाराईट वापरण्यात येत आहे. त्यामुळे बस पूर्णपणे निर्जंतूक होण्यास मदत होते.
२७ लाखांचा तोटा...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एसटीची वाहतूक तेरा दिवस बंद होती. उर्वरित दिवस केवळ अत्यावश्यक सेवेसाठी १०-११ बस सुरू होत्या. यामुळे दीड महिन्यामध्ये एसटी आगाराला २७ लाख रुपयांचा तोटा झाला आहे.
प्रवासी घरातच...
एसटीची प्रवासी वाहतूक हळूहळू सुरू होत आहे; मात्र केवळ अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक सुरू असल्याने प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. वाहतूक पूर्णक्षमतेने सुरू झाल्यास प्रवासी संख्याही वाढणार आहे.
बस सुरू झाली अन् जीवात जीव आला
कोरोनामुळे दीड महिन्यात काहीच बस सुरू होत्या. त्यामुळे महामंडळाला आर्थिक नुकसान होत होते. आता बसची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही प्रमाणात उत्पन्न वाढत आहे.
- एक चालक
प्रवासी संख्या वाढत चालली आहे. निर्बंध हटल्यास बस पूर्ण क्षमतेने सुरू होतील. त्यामुळे एसटी महामंडळापुढे येणाऱ्या अडचणी दूर होतील. वाहक-चालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
- एक वाहक