अकोला : सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलेल्या विवाहित महिलेचा डॉक्टरांच्या चुकीच्या आणि हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आणि त्यानंतरही डॉक्टरांनी उपचार केल्याचा आरोप रुग्ण महिलेच्या नातेवाइकांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रारीद्वारे केला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरणार असल्याचे सांगितले.अकोट तालुक्यातील लोहारी येथील रहिवासी वैभव बाबाराव डिक्कर २६ यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची वहिनी शीतल विनोद डिक्कर (३५) यांचे डोके दुखत असल्याने त्यांना एका हॉस्पिटलला बुधवारी दाखल केले होते. यावेळी सहायक डॉक्टरने तपासणी करून औषधे दिली. त्यानंतर मुख्य डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्या महिला रुग्णाचा ‘एमआयआर’ काढण्यात आला. यावरून आॅपरेशन करण्याचे सांगितले. तसेच पुढील उपचाराकरिता मुंबई, नागपूर येथे पाठविण्याचे सांगितले. रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णाला नागपूर घेऊन जाण्यापूर्वी रुग्णासोबत बोलण्याचा प्रयत्न केला असता ते बेशुद्धावस्थेत असल्याचे समोर आले. तसेच त्या आधीच मृत्यू पावल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण मृत पावला असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला असून, त्यांनी सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सर्वोपचार रुग्णालयात पाठविला आहे.