विझोरा : विझोरा-गोरव्हा रस्त्याच्या एका बाजूने जलवाहिनीचे खोदकाम करताना कंत्राटदाराने जवळपास ३०० वृक्ष तोडल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर कंत्राटदाराने साहित्यासह पळ काढला होता ; मात्र कठोर कारवाई न झाल्याने पुन्हा कंत्राटदाराने बेजबाबदारीने शेकडो झाडे उद्ध्वस्त केली आहेत. याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी सरपंचासह वृक्षप्रेमींनी केली आहे.
महान येथून औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनीचे यंत्राद्वारे खोदकाम सुरू आहे. काम करताना सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्यावरील लावलेल्या दुतर्फा झाडे नष्ट करण्यात आली आहेत. गत तीन ते चार वर्षांपूर्वी शासनाने लाखो रुपये खर्च करून विविध प्रजातींची वृक्ष लागवड केली होती. त्याचे संवर्धन व संगोपनासाठी लाखो रुपयांचा खर्च केला होता. परंतु कंत्राटदार व अभियंत्याने तीन महिन्यांपूर्वी विझोरा-गोरव्हा दरम्यान ३०० झाडे तोडली. याप्रकरणी गोरव्हाचे सरपंच राजेश खांबलकर यांनी सामाजिक वनीकरण विभागाकडे तक्रार दिल्यानंतर कंत्राटदाराने येथून पोबारा केला होता. काही दिवस हे काम बंद होते. दरम्यान आठ दिवसांपासून जलवाहिनीच्या खोदकामाला सुरुवात केल्यावर पुन्हा अनेक झाडे तोडल्याचे समोर येत आहे. (फोटो)
----------
कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी
वृक्षांची कत्तल करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर व अभियंत्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी सरपंचासह वृक्षप्रेमींनी केली आहे.
----------------
सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्यावरील लावलेल्या दुतर्फा झाडे कंत्राटदाराने नष्ट केली आहेत. यापूर्वी हा प्रकार केल्यानंतर पुन्हा झाडे उद्ध्वस्त केली आहेत. याप्रकरणाची वरिष्ठ अधिकारी व पोलिसात तक्रार दाखल करु.
-राजेश खांबलकर, सरपंच, गोरव्हा.