अकोला : वृक्ष लागवड मोहिमेतून ‘एक विद्यार्थी-एक झाड’ उपक्रमात लावलेली रोपे जगवून त्यांचे संवर्धन करण्यासाठी त्या रोपांना ट्री-गार्ड लावण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी अकोला जिल्ह्याला ५१ लाख रुपये निधी मिळणार असून, त्याचे वाटप ग्रामपंचायत स्तरावर केले जाईल, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पाठविले आहे.जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेतून ‘एक विद्यार्थी-एक झाड’ उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी १ लाख ८७ हजार झाडे लावली आहेत. तसेच ग्रामपंचायत स्तरावर १७ लाख झाडे लावण्यात आली. ती सर्व झाडे जगवून हिरवीगार राहावी, यासाठी त्या झाडांचे संरक्षण, संवर्धन करण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाकडून लाखो मनुष्य दिन रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. विभागीय आयुक्तांनी त्यासाठी ५१ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या निधीचे वाटप ग्रामपंचायत स्तरावर केले जाणार आहे.शिक्षण विभागाने प्रयत्नपूर्वक राबविलेल्या ‘एक विद्यार्थी-एक झाड’ मोहिमेतील रोपे जगविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घेतली आहे. मुलांनी लावलेली ती झाडे जगविण्यासाठी शिक्षक-पालकांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुलाचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. त्यासाठी लोकसहभाग मिळविण्याचाही प्रयत्न करावा, त्यातून समाजामध्ये चांगला संदेश दिला जाईल, असेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.