अकोला : प्रत्येक तालुक्यातील एका गावामध्ये एक एकर जमीन क्षेत्रात वृक्षारोपण करून तेथे मियावाकी-अटल आनंदवन साकारले जाणार आहे. त्यासाठी पाच तालुक्यांतील गावांमध्ये मागणीनुसार ८० लाख रुपये निधी खर्च होणार आहे. त्यापैकी ५७ लाख रुपये निधीची मागणी सामाजिक वनीकरण विभागाने जिल्हा परिषदेकडे केली आहे.सामाजिक वनीवरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यासोबत गुरुवारी झालेल्या चर्चेनुसार गावांमध्ये ही योजना राबविली जात आहे. प्रत्येक तालुक्यातील एका गावात एक एकर क्षेत्रावर वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन केले जाणार आहे. मियावाकी अटल आनंदवन प्रकल्पांतर्गत ही निर्मिती केली जाणार आहे. या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करण्याला अंदाजपत्रके सादर करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सामाजिक वनीकरण विभागाला सांगितले. त्यानुसार वनीकरण विभागाने पाच गावांतील आनंदवन निर्मितीचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्या पाच गावांतील प्रत्येक एक एकर क्षेत्रात वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यासाठी ५७ लाख ३७ हजार ७३५ रुपये निधीची मागणीही जिल्हा परिषदेकडे करण्यात आली आहे. तसे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गुरुवारी पाठविण्यात आले. प्रत्येक गावातील आनंदवनासाठी ११ लाख ४७ हजार ५४७ रुपये खर्च केले जाणार आहेत.
आनंदवन निर्मितीची गावेआनंदवनाच्या निर्मितीसाठी निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झालेल्या गावांमध्ये अकोला तालुक्यातील म्हैसांग, बाळापूर-देगाव, बार्शीटाकळी-गोरव्हा, अकोट-पिलकवाडी, तेल्हारा-उमरशेवडी या गावांचा समावेश आहे. चालू वर्षातील निधी उपलब्ध करून देण्याची मागणी विभागीय वन अधिकाºयांनी केली आहे.