अकोला : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षलागवड कार्यक्रमात यंदा जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या स्तरावर ५ लाख ३५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असताना, सप्टेंबर अखेरपर्यत केवळ ५१ हजार ६०० वृक्षलागवड करण्यात आली. सातपैकी तीनच तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या वृक्षलागवडीचा बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर आले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पावसाळ्यात ग्रामपंचायती आणि विविध यंत्रणांमार्फत वृक्षलागवड करण्यात येते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या स्तरावर प्रत्येकी एक हजार याप्रमाणे ५ लाख ३५ हजार वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदमार्फत निश्चित करण्यात आले होते.
वृक्षलागवड करण्याची मुदत गेल्या सप्टेंबर अखेर संपुष्टात आली असून, त्यामध्ये उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी तीनच तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या स्तरावर केवळ ५१ हजार ६०० वृक्षलागवड करण्यात आली आहे. उर्वरित चार तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड केली नसल्याने यंदा जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या स्तरावरील वृक्षलागवडीचा बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर आले आहे.
तीन तालुक्यांत ग्रामपंचायतींच्या वृक्षलागवडीचे असे आहे वास्तव
तालुका वृक्षलागवडअकोला १७,०००पातूर २७,०००बार्शीटाकळी ७६००
५३५ ग्रामपंचायतींपैकी केवळ २३ ग्रामपंचायतींनी केली लागवड !प्रत्येक ग्रामपंचायतीने एक हजार याप्रमाणे जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींनी ५ लाख ३५ हजार वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. परंतु, त्यापैकी केवळ २३ ग्रामपंचायतींनी ५१ हजार ६०० वृक्षलागवड केली आहे. अकोला तालुक्यात १०, पातूर तालुक्यात ९ आणि बार्शीटाकळी तालुक्यात ४ अशा एकूण २३ ग्रामपंचायतींच्या स्तरावर वृक्षलागवड करण्यात आल्याचे चित्र आहे.
चार तालुक्यांत ग्रामपंचायतींनी केली नाही वृक्षलागवड !जिल्ह्यातील अकोला, पातूर व बार्शीटाकळी या तीन तालुक्यांतील ग्रामपंचायतींकडून ५१ हजार ६०० वृक्षलागवड करण्यात आली. परंतु जिल्ह्यातील बाळापूर, अकोट, तेल्हारा व मूर्तिजापूर या चार तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून वृक्षलागवड करण्यात आली नसल्याचे चित्र आहे.
२६ लाख रुपयांचा खर्च !जुलै ते सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या स्तरावर वृक्षलागवड करण्यात आली. त्यामध्ये सातपैकी तीनच तालुक्यांत केवळ ५१ हजार वृक्षलागवड करण्यात आली असून, लागवड आणि संगोपनाच्या कामावर २५ लाख ९७ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.