- संतोष येलकर
अकोला : वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षी जिल्ह्यात १९ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी मे अखेरपर्यंत खड्डे तयार करायचे आहेत. त्यानुषंगाने अकोला जिल्ह्यात २३ मे पर्यंत ११ लाख ६६ हजार खड्डे तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, उरलेल्या ७ दिवसात ७ लाख ५६ हजार खड्डे तयार करण्याचे आव्हान आता संबंधित यंत्रणांपुढे उभे आहे. खड्डे तयार करण्यासाठी केवळ सात दिवसांचा कालावधी उरला असून, या कालावधीत खड्डे तयार करण्याचे काम पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.हरित पर्यावरणासाठी शासनामार्फत राज्यात राबविण्यात येत असलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षी १ ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात १९ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मे अखेरपर्यंत (३१ मे) खड्डे तयार करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. त्यानुषंगाने वृक्ष लागवडीसाठी खड्डे तयार करण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये विविध संबंधित यंत्रणांमार्फत २३ मे पर्यंत जिल्ह्यातील अकोला, अकोट, बार्शीटाकळी, बाळापूर, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात ११ लाख ६६ हजार खड्डे तयार करण्यात आले आहेत. खड्डे तयार करण्यासाठी आता केवळ सात दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यानुषंगाने सात दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ७ लाख ५६ हजार खड्डे तयार करण्याचे आव्हान संबंधित यंत्रणांपुढे उभे असून, सात दिवसांच्या कालावधीत खड्डे तयार करण्याचे काम पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.वृक्ष लागवडीचे विभागनिहाय असे आहे उद्दिष्ट !विभाग उद्दिष्ट (लाखात)वन विभाग ५.५०सामाजिक वनीकरण ५.००ग्राम पंचायत विभाग ५.९१कृषी विभाग ० .७०नगरविकास विभाग ०.४३जलसंपदा विभाग ०.१२इतर विभाग १.५६.........................................................एकूण १९.२२खड्डे तयार करण्याच्या नियोजनावर दृष्टिक्षेप !-एकूण करावयाचे खड्डे : १९ .२२ लाख-तयार केलेले खड्डे : ११.६६ लाख-बाकी असलेले खड्डे : ०७.५६ लाख