लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील पातूर तालुक्यात गत चार वर्षात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीचा त्रिसदस्यीय समितीकडून करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) सादर करण्यात आला आहे. चौकशी अहवालानुसार तालुक्यातील वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. त्यामुळे चौकशी अहवालानुसार संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते रमन जैन यांनी सोमवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली.पातूर तालुक्यात सन २०१२ ते २०१६ या चार वर्षाच्या कालावधीत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्यासाठी गत एप्रिलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती गठित करून चौकशीचा अहवाल सादर करण्याचा आदेश चौकशी समितीला दिला होता. त्यानुषंगाने तालुक्यात करण्यात आलेली वृक्ष लागवड, त्यापैकी जिवंत असलेले वृक्ष आणि वृक्ष संगोपन व संरक्षणाच्या कामावर करण्यात आलेल्या खर्चासंबंधी पंचनामे करून, चौकशी समितीने गत मे अखेरपर्यंत चौकशी पूर्ण करून, ११ जुलै रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार तालुक्यात ६० ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली असून, करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीपैकी केवळ १५ ते २० टक्केच वृक्ष जिवंत असल्याचे आढळून आले. तसेच जिवंत नसलेल्या वृक्षांच्या संरक्षण व संगोपनाच्या मजुरीवर मात्र खर्च करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे पातूर तालुक्यातील वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची बाब समोर आली आहे. त्यानुषंगाने यासंदर्भात जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते रमन जैन यांच्यासह सदस्य मनोहर हरणे, विजय आखरे यांनी सोमवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. वृक्ष लागवडीतील घोळाबाबत चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.पातूर तालुक्यात वृक्ष लागवडीतील घोळाबाबत आम्ही पालकमंत्र्यांसोबत चर्चा करून, चौकशी समितीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. - रमन जैन, विरोधी पक्षनेता, जिल्हा परिषद
वृक्ष लागवडीत घोळ; पालकमंत्र्यांकडे तक्रार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:16 AM