-------------------------
व्यायामशाळा उभारण्याची मागणी
बाळापूर: तालुक्यातील काही गावात व्यायामशाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. त्यामुळे व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत; मात्र अजूनही काही गावात व्यायामशाळा नाहीत. यावर्षी कोरोनामुळे व्यायाम केंद्रावर निर्बंध आले आहेत.
-------------------------------------
मूर्तिजापूर येथे कोरोनाच्या नियमांची पायमल्ली
मूर्तिजापूर : कोरोनाला हरविण्यासाठी ज्या प्रकारे राज्य शासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत, त्याचप्रकारे जिल्हा पातळीवरसुद्धा कडक निर्बंध मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहेत. राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन नियमांनंतरही सकाळच्या वेळी तर शहरातील बाजारपेठ व सर्वत्र गर्दीच गर्दी असे चित्र दिसून आले.
--------------------------------------------
ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना
तेल्हारा : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते; मात्र अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. यावर्षीच्या पावसाने तर शहरी तसेच ग्रामीण रस्त्यांची वाट लागली आहे. ग्रामीण रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी अनेकदा अधिकाऱ्यांकडे करण्यात येते; मात्र रस्ता दुरुस्ती करण्यात टाळाटाळ केली जात आहे.
--------------------------------------------------
रिक्त पदांमुळे योजना पोहोचल्याच नाहीत
पातूर : कृषी विकासाला चालना देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, विविध पदे रिक्त असल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. सुधारीत आकृतिबंधानुसार अनेक पदांना मंजुरी आहे, पण पदभरती झाली नाही. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अडचण जात आहे.
-----------------------------------
वीज बिलामुळे सामान्य ग्राहक त्रस्त
खानापूर : महावितरण कंपनीकडून वारंवार वीज दरवाढ, अतिरिक्त शुल्क तर कधी अतिरिक्त सुरक्षा रकमेची देयके पाठविली जात आहेत. या मनमानी कारभाराने त्रस्त असलेल्या वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. खानापूर परिसरात अवाजावी वीज बिल आल्यामुळे ग्रामस्थांसमोर बिल भरावे की उदरनिर्वाह करावा, असा प्रश्न पडला आहे.
-----------------------------------
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
चतारी : परिसरात वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक शासकीय कामे खंडित होत आहे. याशिवाय सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने वीज खंडित झाली की नागरिक त्रस्त होतात. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
----------------------------
वाहनावर मोबाईलचा वापर धोकादायक
अकोट : वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणे कायद्याने गुन्हा आहे; परंतु आजही अनेकजण महामार्गावरील तसेच शहरातील रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करतात. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
-----------------------------------
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
निंबा फाटा : बाळापूर तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. निंबा फाटा परिसरातही जड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
----------------------------
केरोसीनअभावी अडचण वाढली!
हिवरखेड : केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने आता बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र केरोसीन बंद झाल्याने अडचण जात आहे. केरोसीन पुरविण्याची मागणी आहे.
-----------------------
गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता
पातूर : शहरातील रस्त्यांवर गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने जात आहे. यामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रमुख मार्ग असल्याने नागरिकांना याच दिशेने जावे लागते. त्यामुळे पोलीस व बांधकाम विभागाने समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. मागील काही वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे.
---------------------------
आगर परिसरात अवकाळी पाऊस
आगर : परिसरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाला सुरुवात होताच वीजपुरवठाही खंडित झाला होता. दरम्यान, पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून, शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होत आहे.
————————
उगवा फाटा येथील प्रवासी निवारा शोभेचा
चोहोट्टा बाजार : अकोट-अकोला मार्गावर असलेला उगवा फाटा येथील प्रवासी निवारा सध्या शोभेची वास्तू बनलेला आहे. बऱ्याच गाड्यांचा थांबा असल्यामुळे परिसरातील प्रवाशांना प्रवासी निवाऱ्याबाहेर उभे राहून गैरसोयीचा सामना करावा लागतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
—————————
शेतशिवारात रानडुकरांचा धुमाकूळ
पांढूर्णा : पातूर तालुक्यातील अनेक शेतशिवारात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. दिवसा नदीकाठाजवळ राहून रात्रीच्या सुमारास रानटी डुकरे शेतात शिरून भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. वन कायद्यामुळे हात बांधले असल्याने शेतकऱ्यांना काय करावे, असा प्रश्न पडला आहे. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.