अकोला : गेल्या काही वर्षांत प्रथमच सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. पाटसऱ्यांतून वाटपाची पद्धत कोलमडल्याने पाणी पिकांसोबतच खुली जमीन, नाल्या, ओसाड भागात खेळत आहे. त्यातून पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे. त्याचवेळी खारपाणपट्ट्यातील गावांना पंधरा दिवसांआड पाणी पुरवठा होत असून, पाटबंधारे विभागाने पाण्याची नासाडी रोखण्याची मागणी होत आहे.जिल्ह्यातील सर्व धरणात एकूण २१६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी यावर्षी १४० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. त्यामुळे या रब्बी हंगामात पिकांची सोय झाली आहे.बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा धरणात ६३.८६ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. या धरणातूनही १ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात येत आहे. सहा पाळीत हे पाणी सोडण्यात येत आहे. त्यातून आतापर्यंत ११ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे; मात्र पाटसºयांतून वाटप करण्यासाठी योग्य खबरदारी न घेतल्याचे खारपाणपट्ट्यातील गावांमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे, खांबोरा ६४ योजनेवर अवलंबून असलेल्या खारपाणपट्ट्यातील गावांना पंधरा दिवसांआड पाणी मिळत असताना पाण्याची नासाडी होण्याचा गंभीर प्रकार घडत आहे.काटेपूर्णा धरणातून सध्या पळसो बढे, दहीगाव (गावंडे), धोतर्डी, सांगळूद या भागांतील पिकांसाठी पाणी मिळत आहे. कालव्याद्वारे पाणी वाहत आहे. त्या कालव्याचे दरवाजे बंद न केल्याने पाणी मिळेल त्या मार्गाने धावत असल्याचे चित्र या गावांमध्ये पाहावयास मिळत आहे. पीक नसलेल्या खुल्या जागा, रस्ता दुतर्फा खोदलेल्या नाल्या, शेतातील चरांमध्ये पाणी साठत आहे. या गावांतील नाल्यांमधूनही सिंचनाचे पाणी वाहताना दिसत आहे. काही शेतकºयांनी तर जेसीबीद्वारे नाल्या खोदून पाणी घेतल्याने त्यातही पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे. पाटबंधारे विभागाचे प्रचंड दुर्लक्ष त्याचवेळी ग्रामस्थांच्या बेपवाईने पाण्याची नासाडी होत आहे. ती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी घुसर गणाच्या पंचायत समिती सदस्य रूपाली सतीश गोपनारायण यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली आहे.
लगतच्या गावांना १५ दिवसांआड पाणी६४ खेडी योजनेतून पाणी पुरवठा होणाºया खारपाणपट्ट्यातील गावांना १५ दिवसांआड पाणी मिळत आहे. घुसर, आपातापा, आपोती, कपलेश्वर, एकलारा, घुसरवाडी या गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळेल की नाही, अशी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.