या प्रकरणात साक्ष देण्याकरिता तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना जमानती वाॅरंट व नगर परिषद कल्पतरू विद्यामंदिरच्या मुख्याध्यापकांना साक्ष देण्याकरिता समन्स न्यायालयाने बजावले होते. दरम्यान, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे हे दि. २ एप्रिल रोजी न्यायालयात साक्ष देण्याकामी हजर झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात एसडीपीओ सोनवणेंची साक्ष नोंदवणे सुरू झाले. न्यायालयात सरकारी वकील अजित देशमुख यांनी घटना व तपासासंदर्भात साक्ष घेतली. घडलेली घटना गंभीर असून या खटल्यातील एसडीपीओ यांची उर्वरित साक्ष नोंदविण्यासाठी ६ एप्रिल ही तारीख ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख, तर आरोपीच्या वतीने ॲड. मोहन मोयल, ॲड. दिलदार खान यांनी काम पाहिले.
हिवरखेड मार्गावरील फिजा धाब्यावर पोटाची खळगी भरण्याकरिता बालकामगार म्हणून असलेल्या मध्यप्रदेशातील नेपानगर येथील आदिवासी बालकाला चटके देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना ५ डिसेंबर २०१८ रोजी घडली होती. या हत्याकाडांतील घटनास्थळाचा उल्लेख करीत अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपी फिरोज खान अकबर खान, सलीम खान अकबर खान, इमरान खान अकबर खान, अकबर खान जब्बार खान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे. या खटल्यातील दोन आरोपी कारागृहात, तर दोन आरोपी जामिनावर आहेत.