अकोला : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर भागातील गावांमधून अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील गावांमध्ये पुनर्वसित झालेले आदिवासी बांधव त्यांच्या विविध मागण्यांसाठी लढा देत आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे अखेर या आदिवासी बांधवांनी गुरुवार ६ डिसेंबर रोजी अकोट येथून अकोल्याच्या दिशेने कुच केली. शुक्रवार, ७ डिसेंबर रोजी आदीवासींचा हा लाँगमार्च अकोला शहरात दाखल झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्र असंघटीत कामगार काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली हा पायदळ मोर्चो निघाला आहे. हातात न्याय मागणीचे फलक घेऊन मोर्चात महीला, पुरुष मुलाबाळांसह सहभागी झाले आहेत. मोर्चात आमदार आशिष देशमुख, प्रमोद चोरे, असंघटीत कामगार काँग्रेसचे अध्यक्ष मो.बद्रुज्जमा, असंघटीत कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप नारे, तालुकाध्यक्ष गजानन रेळे, शहर अध्यक्ष महादेवराव सातपुते, अ.भा.आदिवासी परिषद चे कार्याध्यक्ष डिगांबर सोळंके,आनंद अग्रवाल, सेवादलाचे विजय शर्मा सहभागी झाले आहेत.आकोट तालुक्यात पुनर्वसीत झालेल्या गावांमध्ये शेतजमिनीसह मुलभूत सुविधा पुर्णत: मिळाल्या नाहीत. विशेष म्हणजे त्यांना कुठलेही रोजगाराचे साधन नाही. आरोग्य, शैक्षणिक, पिण्याचे पाणी, बेरोजगारी आदींसह विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मागण्यांसाठी गुरुवारी अकोट येथून निघालेल्या आदीवासींनी रात्रीचा मुक्काम दहीहांडा फाट्यावर केला. शुक्रवारी पहाटेच हा मोर्चा अकोल्याच्या दिशेने रवाना झाला. दुपारी जिल्हाधिकाºयांना भेटून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.या पदयात्रेला संबोधित करण्याकरिता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेता बाळासाहेब विखे पाटील, निरीक्षक सहप्रभारी आशिष दुवा, माणिकराव ठाकरे, अरविंद सिंग, इरफान आलम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, यशोमती ठाकूर, आरिफ नसिम खान, आसिफ देशमुख, चारुलता टोकस, केवलराम काळे, नामदेव उसंडी, वजाहत मिर्झा यांची उपस्थिती राहणार आहे.