डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना विदर्भातच व्हावी, याकरिता १९६८ साली प्रचंड मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. यातील सहभागी आंदोलकांनी २० ऑगस्ट रोजी अमरावती येथे उग्र निदर्शने केली होती. या आंदोलकांना रोखण्यासाठी झालेल्या गोळीबारात नरेंद्र देशमुख, सुरेश भडके, भिरुमल रिझुमल, सुरेश कुऱ्हे, प्रफुल्लचंद्र कोठारी, गजानन देवघरे, नेमीचंद गोपाल, सुरेश वानखडे, शेख रफिक शहीद झाले, तर असंख्य विदर्भवीर जखमी झाले. या शहिदांचे बलिदान मात्र व्यर्थ गेले नाही. कारण विदर्भाच्या शेती क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना अकोला येथे २० ऑक्टोबर १९६९ रोजी झाली.
विद्यापीठ स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी २० ऑगस्ट रोजी दरवर्षी विशेष सभेचे आयोजन करण्यात येते. वरुणराजाच्या साक्षीने शुक्रवारी संपन्न झालेल्या या श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांची उपस्थिती होती. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. किशोर कुबडे यांच्या मार्गदर्शनात मंजुषा देशमुख, शशी भोयर, रोहित तांबे व इतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.