अकोला : अवैध गर्भपात करणारी महिला डॉक्टर मनीषा गावंडे-देशमुख हिच्यासह एक एजंट आणि नर्सला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ डिसेंबर रोजी अवैध गर्भपात करताना रंगेहात अटक केली होती. त्यानंतर या तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती; मात्र मंगळवारी पोलीस कोठडी संपताच या तिघांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली आहे.शिवणी परिसरातील आंबेडकर चौकामध्ये असलेल्या सात्विक क्लिनीकमधील महिला डॉ. रोशनी गावंडे (देशमुख) ही पैशाच्या लालसेपोटी अवैध गर्भपात करीत होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित विभाग म्हणजेच अन्न व औषध प्रशासन आणि महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला सोबत घेऊन महिला डॉ. रोशनी गावंडे देशमुख, एजंट गोपाल गायकवाड, नर्स लांजुरकर या तिघांना अटक केली. याप्रकरणी आरोपीवर भारतीय दंड विधानाच्या कलम ३१२, ३१३, ४१९, ४२०, ३३४, वैद्यकीय गर्भपात अधिनियम १९७१ च्या कलम ३, ४, महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमाच्या कलम ३३, मुंबई नर्सिंग होम ३, ६, अन्न व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४० च्या १८ सी, २७ ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली आहे.