अकोला: गत वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्राथमिक शाळा बंद आहेत. असे असतानाही पालकांचा आरटीई प्रवेशाकडे मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे. यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के मोफत जागांवर प्रवेशासाठी उपलब्ध जागांपेक्षा तिप्पट विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे हजारो पालकांची निराशा होणार आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिल्या वर्गाच्या २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. त्यानुसार जिल्ह्यातील आरटीई नोंदणीकृत २०२ शाळांमधील १९६० जागा यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी राखीव करण्यात आल्या आहेत. या राखीव जागांच्या प्रवेशासाठी ३० मार्चपर्यंत पालकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेक अडचणी येत असतानाही पालकांकडून आरटीई प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात येत आहेत. आतापर्यंत पालकांनी उपलब्ध जागांपेक्षा तिप्पट ४ हजार ४०७ अर्ज दाखल केले आहेत. यंदा आरटीई प्रवेशाला प्रतिसाद कमी मिळत असल्याचे पाहून अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यानंतर पालकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले. सद्यस्थितीत ४ हजारावर प्रवेश अर्ज आले आहेत. सोडतीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्यामुळे यातील हजारो पालकांची निराशा होणार आहे.
आरटीईतर्गंत नोंदणीकृत शाळा- २०२
उपलब्ध जागा- १९६०
केलेले अर्ज- ४७०७
आता सोडतीकडे लक्ष
अकोला जिल्ह्यात २०२ शाळांमधील १९६० जागांसाठी ४७०७ अर्ज आले आहेत. आता लॉटरी पद्धतीने या जागांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. १५ एप्रिल रोजी पहिली सोडत काढण्यात येणार आहे. अर्ज दाखल केलेल्या पालकांचे सोडतीकडे लक्ष लागले आहे.
पालकांनी याकडे लक्ष द्यावे
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२०२२ या वर्षाकरिता लॉटरीद्वारे पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून एसएमएस प्राप्त होतील. पालकांनी एसएमएसवर अवलंबून राहू नये. आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून आपल्या अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक पहावा. प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या विद्यार्थ्यांचे लॉटरीमध्ये सिलेक्शन झालेले आहे त्यांनी प्रवेशाकरिता एसएमएसद्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच पडताळणी समितीकडे जावे.
पालकांनी प्रवेशाकरिता ही कागदपत्रे न्यावी
प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती, आरटीई पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर क्लिक करून हमीपत्र आणि ऑलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून पडताळणी समितीकडे घेऊन जावे. पडताळणी समितीकडे प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच जाताना आपल्या पाल्याला बरोबर घेऊन जाऊ नये. मुदतीनंतर संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.