विजय शिंदे - अकोटमहाराष्ट्र शासनाचे जलयुक्त शिवार अभियान हे अकोट तालुक्यात यावर्षी शेतकऱ्यांकरिता छळयुक्त ठरत असल्याचे दिसून येत आहे. महसूल विभागाने एकाच ठेकेदाराला तासाने जलयुक्तची कामे दिली. त्यानंतर ते कंत्राट रद्द केले आहे. आता कृषी विभागाने या कामांकरिता ई-टेंडर बोलाविण्याची तयारी सुरू केली आहे. महसूल विभागाने जलसंधारणाच्या कामात खोडा घातल्याने यावर्षी उन्हाळ्यात सुरू होणारी जलयुक्त शिवार अभियानाची कामे पावसाळ्यात होतात की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अकोट तालुक्यात सन २०१७-१८ करिता १९ गावांची निवड करण्याचे लक्ष्यांक कृषी व महसूल विभागाने ठेवले आहे; परंतु अद्यापपर्यंत गावांची निवडसुद्धा होऊ शकली नाही. विशेष म्हणजे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे होण्याकरिता अकोट तहसील कार्यालयाकडे कृषी विभागाने ३६ कामांची परवानगी मागितली होती; परंतु ४-५ कामे मंजूर आराखड्यानुसार नसल्याने तहसील कार्यालयाने सरसकट सर्वच कामे नामंजूर केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जलयुक्त शिवारच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. जलयुक्त शिवार अभियानाची कामे कृषी विभाग, जिल्हा परिषद लघुसिंचन, लघुसिंचन जलसंधारण, सामाजिक वनीकरण व पाटबंधारे विभाग, पंचायत समिती यांच्या मार्फत करण्यात येतात. या योजनेला सन २०१५-१६ मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. महसूल व कृषी विभागाने खोलीकरण व रुंदीकरणाची बहुतांश कामे करून अनेक गावे पाणीदार केली होती; परंतु २०१६-१७ या कालावधीत या योजनेंतर्गत्त अनेक कामे रखडली. एकाच व्यक्तीच्या हाती सर्व कामे देण्याचा मनसुबा महसूल विभागाने रचल्याने कृषी विभागानेसुद्धा त्याला प्रतिसाद दिला नाही. तर महसूल विभागानेसुद्धा कृषी विभागाने सादर केलेल्या अनेक आराखड्यांना मंजुरी दिली नाही. यामध्ये जलसंधारणाची आस घेऊन बसलेल्या शेतकऱ्यांचा चांगलाच छळ झाला. विशेष म्हणजे शासनाची योजना असतानाही महसूल विभागाने जलयुक्त शिवार अभियानाची व्यापक जनजागृती न करता उलट खोडा घालण्याचे काम केल्याने शासनाचे हे जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांकरिता छळयुक्त ठरले आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१६-१७ मध्ये २३ गावांची निवड करण्यात आली होती. या २३ गावांकरिता ७५९ कामे घेण्यात आली, त्यापैकी २४२ कामांना तांत्रिक मंजुरी, तर १६१ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली, तर केवळ ११३ कामांवर १४८.00 लक्ष खर्च दाखविण्यात आला आहे. शिवाय सन २०१५-१६ मध्ये ३५ गावे योजनेत सहभागी झाली होती. त्यापैकी ३३ गावे जलयुक्त झाली आहेत. या ३३ गावांमध्ये २३५ पैकी २०४ कामे करण्यात आली असून, या कामांवर ५४१.३६ लक्ष रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. वॉटर कप स्पर्धा सेल्फी पॉइंट महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती करण्याकरिता अधिकारी वर्ग कमी पडत आहेत. दुसरीकडे मात्र पाणी फाउंडेशन या खासगी संस्थेने सुरू केलेल्या वॉटर कप स्पर्धेत हिरिरीने भाग घेताना दिसत आहेत. या स्पर्धेत अकोट तालुक्यातून ३५ गावांची निवड करण्यात आली आहे; मात्र अनेक ठिकाणी श्रमदान कमी आणि सेल्फी फोटो घेणाऱ्यांची संख्याच जास्त दिसून येत आहे. अशा स्थितीत वॉटर कप स्पर्धा श्रमदानाचे स्थळ हे सेल्फी पॉइंट ठरत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अकोट तालुक्यात यावर्षी १९ गावांची निवड करणे सुरू आहे. अनेक गावे जलयुक्त झाली आहेत. लवकरच ई- टेंडरद्वारे जलसंधारणाची कामे काढून कामांना प्रारंभ करण्यात येईल. - मंगेश ठाकरे, तालुका कृषी अधिकारी, अकोट
जलयुक्त शिवार बनले शेतकऱ्यांसाठी छळयुक्त!
By admin | Published: May 02, 2017 1:14 AM