अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील खडकी चांदूर पुलावरून जात असलेल्या एका दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात टिप्पर पुलावरून खाली कोसळल्याने त्यामधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बाळापूर तालुक्यातील पारस येथील राखड मूर्तिजापूर येथे खाली करून परत येत असताना एम एच १६ एवाय ९१४० क्रमांकाच्या टिप्परसमोर एम एच ३० एएल ७१५६ क्रमांकाची दुचाकी आली. या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात टिप्पर पुलावरून खाली कोसळला. यामध्ये टिप्परमधील प्रमोद प्रकाश चक्रे चालक व अक्षय संजय जाधव क्लिनर हे दोघे जण जागेवरच ठार झाले. ते दोघेही अनभोरा येथील रहिवासी होते. तर दुचाकीवरील जयप्रकाश ओमप्रकाश वर्मा आणि मनीष सिद्धार्थ इंगळे राहणार डाबकी रोड हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना पोलिसांनी तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार डी. सी. खंडेराव यांनी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी दाखल केले. तर दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
रिधोरा-शिवणी बायपास मार्गावर अपघातांची मालिका
रिधोरा ते शिवणी हा राष्ट्रीय महामार्ग शहराच्या बाहेर नेण्यात आला आहे. मात्र जेव्हापासून हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे तेव्हापासून या राष्ट्रीय महामार्गावर तसेच पुलावरून वाहने खाली कोसळण्याच्या आतापर्यंत ५० पेक्षा अधिक घटना घडल्याची माहिती आहे. तब्बल १०० पेक्षा अधिक जणांचा अपघातात मृत्यू झाला असून हा महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. एका कुटुंबातील तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटनाही याच महामार्गावर घडल्याची माहिती आहे.