पोपटखेड : अकोट तालुक्यातील पोपटखेड-हरिसाल मार्गावर पोपटखेडनजीक एका ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार, दि. १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चुन्नीलाल गवते (२८) (रा. राहणापूर) असे मृत युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, अकोट तालुक्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक सर्रास सुरू असून, पोपटखेड-हरिसाल रस्त्याने हे ट्रक सुसाट वेगाने धावतात. तालुक्यातील राहणापूर येथील चुन्नीलाल गवते हा दुचाकी क्रमांक (एमएच ३०, टी ३३९४) ने पोपटखेड-हरिसाल मार्गाने जात असताना गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रक क्रं. (एमएच १६, सीसी ५०३२)ने पोपटखेडनजीकच्या धरणाजवळ दुचाकीस्वारास चिरडले. या अपघातात दुचाकीस्वार चुन्नीलाल गवते (२८) याचा जागीच मृत्यू झाला. यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून ट्रक पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ट्रक पकडला असून, ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ट्रकचालक फरार असल्याची माहिती आहे. पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक ज्ञाानोबा फड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.
----------------------------------
गौण खनिजाची अवैध वाहतूक वाढली!
अकोट तालुक्यातील गाजीपूर, रुधाळी परिसरात गौण खनिजाची अवैध वाहतूक वाढली आहे. गौण खनिजाने भरलेले अवजड वाहने पोपडखेड-रुधाळी मार्गाने भरधाव वेगाने धावतात. तसेच क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिज वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. या मार्गाने अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, अशी मागणी पोपटखेडवासीयांनी केली आहे.
------------------------------------