अकोला : अकोट येथील एका लग्नसोहळ्यात भजनाचा कार्यक्रम आटोपून अकोल्याकडे परत येत असलेल्या दुचाकीला वल्लभनगरजवळ धडक देणाऱ्या ट्रकचालक कीशन घोगरे याला वाहतुक शाखेचे प्रमूख विलास पाटील व त्यांच्या पथकाने अटक केली. सदर ट्रकही जप्त करण्यात आला असून या अपघातात संतोष मारोती गवई आणि शालिनी विठ्ठलराव वेलनकर या दोघांचा मृत्यू झाला.खामगाव येथील बाळापूर फैलमधील रहिवासी संतोष मारोती गवई (२३) व मोठी उमरी येथील रहिवासी शालिनी विठ्ठलराव वेलनकर हे लग्नसमारंभाआधी होणाºया गोंधळाचे कार्यक्रम आयोजित करतात. अशाच प्रकारचा गोंधळाचा कार्यक्रम अकोट येथील बबन गटकर यांच्या घरी शुक्रवार ४ मे रोजी रात्री घेण्यात आला, त्यानंतर शनिवारी पहाटे हे दोघेही एमएच २९ पी ९९८२ क्रमांकाच्या दुचाकीने अकोल्याकडे येत असताना वल्लभनगरजवळ भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली होती. या अपघातामध्ये संतोष गवई यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर शालिनी वेलनकर या गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. मृतक शालिनी वेलनकर यांचा मुलगा गणेश वेलनकर यांच्या तक्रारीवरून अकोट फैल पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू केला होता, मात्र वाहतुक शाखेचे प्रमूख विलास पाटील यांना सदर ट्रकचालक व ट्रकची माहिती मिळताच त्यांनी ट्रकचालक कीशन घोगरे रा. सांगवी बाजार याला अटक केली. त्यानंतर सदर आरोपीस आकोट फैल पोलिसांच्या ताब्यात दिले.