पातूर (जि. अकोला): वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथून पातूरकडे येताना रस्त्याच्या कडेला मोटारसायकल उभी करून थांबलेल्या एका दाम्पत्यास पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना पातूर घाटात शुक्रवारी सकाळी घडली. म्हसोबा मंदिराजवळ एक ट्रक नादुरुस्त झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. त्यामुळे अनेक वाहने अडकून पडली होती. यावेळी मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर येथील रहिवासी सतीष ज्ञानबा सोमटकर (३०) हे त्यांची पत्नी वैशाली (२५) हिच्यासोबत मोटारसाकलवरून (क्र. एम.एच. ३७ एन. ०५५१) पातुरकडे येत होते. घाटात वाहतुक कोंडी झालेली पाहून सतीष सोमटकर यांनी एका टिप्परच्या मागे आपली दुचाकी उभी केली व दोघेही दुचाकीवरच बसून वाहतुक कोंडी फुटण्याच वाट पाहत होते. यावेळी मालेगावकडून पातूरकडे येत असलेल्या एम.एच. ३७ टी. ५१५१ क्रमांकाच्या ट्रकने या दोघा दाम्पत्यास जोरदार धडक दिली. यामध्ये वैशाली सोमटकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर सतीष सोमटकर गंभीर जखमी झाले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी वैशाली यांना मृत घोषीत केले. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक पसार झाला. पातूर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. (तालुका प्रतिनिधी)