वणी वारुळा/आकोट: ट्रकने प्रवासी ऑटोरिक्षाला दिलेल्या धडकेत ४ भाविक ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री उशिरा तांदूळवाडी फाट्याजवळ घडली. मृतक हे सोमठाणा येथील रहिवासी होते. महाशिवरात्रीनिमित्त भजन आटोपून घरी जात असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. सोमठाणा येथील भजन मंडळ एमएच ३0 पी ८९६४ या क्रमांकाच्या ऑटोरिक्षाने आकोट येथे ७ मार्च रोजी भजनांसाठी आले. भजनांचा कार्यक्रम आटोपून रात्री १ वाजताच्या सुमारास ते परतीच्या प्रवासाला निघाले. तांदूळवाडी फाट्यानजीक एमपी-0७-एचबी १0२७ या क्रमांकाच्या ट्रकने ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली. ऑटोरिक्षातून प्रवास करीत असलेल्या चार भाविकांचा या अपघातात मृत्यू झाला. जखमींना प्रथम आकोट येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी विठ्ठल मन्साराम दुतोंडे (रा. सोमठाणा) यांनी आकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भादंविचे कलम कलम २७९ (सार्वजनिक रस्त्यावर हलगर्जीपणे वाहन चालविणे) ३३७ (स्वत:ची व इतरांची सुरक्षा धोक्यात आणणे), ३३८ (इतरांना दुखापत पोहोचविणे), ३0४ अ ( हलगर्जीपणे कृती करून मृत्यूस कारणीभूत ठरणे) व मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दुर्घटनेत ट्रक व ऑटोरिक्षाचे प्रचंड नुकसान झाले. लघुशंकेसाठी थांबणे अंगलट आले सोमठाणा येथील भाविक आकोट येथे गणेश सराफ यांच्याकडे महाशिवरात्रीनिमित्त भजनांसाठी गेले होते. भजन संपल्यानंतर गावी परत जात असताना त्यांनी ऑटोरिक्षा लघुशंकेसाठी तांदूळवाडी फाट्यानजीक थांबविला. ऑटोरिक्षातून उतरत असतानाच ट्रकने त्यांना उडविले. हा ट्रक अकोल्यावरून मध्यप्रदेशकडे जात होता. अपघातानंतर ट्रकचालक, क्लीनरने घटनास्थळाहून पलायन केले.हे पडले मृत्युमुखी ट्रकने धडक दिल्याने दीपक हरिभाऊ कोल्हे, मुरलीधर सुखदेव निमकाळे, अंबादास बळीराम मेंहगे, पांडुरंग मन्साराम निमकाळे हे चार जण घटनास्थळीच ठार झाले.
ट्रकची ऑटोरिक्षाला धडक; चार ठार
By admin | Published: March 09, 2016 2:26 AM