अकोला: जे काही बदल होत असतात, ते स्वीकारणे कठीण जात असतात, त्याला मानवी अहंकार आडवा येतो. म्हणूनच कुणाला जाणवू न देता असे काही बदल करावे लागतात. जलसंधारण आणि सिंचनाच्या बाबतीतही काही चांगले बदल करण्यात येत आहेत. ते बदल स्वीकारले पाहिजे. शेतकरी त्यादृष्टीने प्रयत्न करतोय; परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबल्या नाहीत. त्यावर अद्याप कोणताही तोडगा काढता आला नाही, अशी खंत व्यक्त करताना यामागील सूक्ष्म कारण शोधून उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शनिवारी अकोला येथे केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि सिंचन सहयोग, अकोलाच्यावतीने डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात आयोजित दोन दिवसीय २० व्या राज्यस्तरीय महाराष्टÑ सिंचन परिषदेचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. मंचावर आंतरराष्टÑीय जलसिंचन व जलनिस्सारण आयोगाचे माजी सहकार्यवाह डॉ. माधवराव चितळे, महाराष्टÑ सिंचन सहयोग अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे औरंगाबाद, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, तापी खोरे विकास महामंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक संजय कुळकर्णी जळगाव, पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र जलतारे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अधीक्षक अभियंता संजयकुमार अवस्थी, डॉ. बापू अडकिने, कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, संचालक शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर,अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. एम.बी. नागदेवे यांची उपस्थिती होती.धोेत्रे पुढे म्हणाले, रासायनिक खते, कीटकनाशकांनी शेतीची पोत बदलली असून, यामुळे पाण्याचे जमिनीत जलसंधारण होत नाही. म्हणूनच आता जमिनीची सुपीकता वाढविण्यावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. नलिका वितरण प्रणालीवर बोलताना ते म्हणाले, तात्पुरता फायदा बघण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजनांकडे बघणे गरजेचे आहे. कालव्याने पाणी सोडले तर शेतकºयांच्या विहिरीतील पातळी वाढते; परंतु पाइपने पाणी सोडले तर शेतकºयांच्या विहिरींना पाणी कसे येणार, असा प्रश्न शेतकºयांमधून उपस्थित होत आहे. म्हणूनच कोणतेही व्यवस्थापन करा; पण ते परिपूर्ण, योग्य असावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी प्रयत्न करा! - केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 6:38 PM