लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुदत संपलेला शासकीय औषधांचा साठा जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याचा प्रकार बुधवारी, अकोट मार्गावर सकाळी उघडकीस आला. येथील केडिया दाळ मिल जवळच्या एका गोडावूनमागे हा साठा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ओरल डिहायड्रेशन साल्टचे पावडर पाऊच आणि २५० एमजीच्या ईरीथ्रोमॅसीन टॅबलेटसच्या स्ट्रीप अर्धवट जळालेल्या स्थितीत गुरुवारी सकाळी आढळल्या. मे २०१५ मध्ये निर्मित झालेला हा साठा एप्रिल २०१७ मध्ये एक्सपायर झाला आहे. कालमर्यादा संपुष्टात आलेला हा औषध साठा शासकीय असून, त्यावर ‘नॉट फार सेल’ असे नमूद आहे. एखाद्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे हा साठा सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलेला होता; मात्र हा साठा गोरगरिबांमध्ये पोहोचविण्यात शासकीय यंत्रणा कुचकामी ठरली आहे. हे या प्रकारावरून समोर येत आहे.अतिसार - जुलाब असताना ओरल डिहायड्रेशन पावडर पाण्यात विरघळून दिले जाते. तर ईरीथ्रोमॅसीन टॅबलेटसचा वापर त्वचा आणि तोंडातील रोगासाठी केला जातो, अशी माहिती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय दवाखान्यातून हा साठा विनामूल्य रुग्णांना वितरित केला जातो.
मुदत संपलेला औषध साठा जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 1:33 AM